मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट

लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबादसह नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील रब्बी पिकांची वाटचालही संकटाचीच राहिली आहे.
Crisis of diseases on rabbis in Marathwada
Crisis of diseases on rabbis in Marathwada

लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत लातूर, उस्मानाबादसह नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील रब्बी पिकांची वाटचालही संकटाचीच राहिली आहे. खरिपावरील नैसर्गिक आघातानंतर आशा टिकून असलेल्या रब्बीवरही प्रतिकूल वातावरणामुळे कीड, रोगांचे संकट घोंघावत आहे. 

लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १० लाख ८६ हजार ६०७ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत १३२ टक्‍के अर्थात १४ लाख ३५ हजार ३३६ हेक्‍टरवर ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल, इतर तृणधान्य, कडधान्य व गळीतधान्यवर्गीय पिकांची पेरणी झाली आहे.

अति पाऊस व पुरामुळे खरीपावर संकट ओढवले. रब्बीवरही रोग व किडींचा प्रादूर्भाव दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होण्यासह उत्पादनातही फटका बसण्याची शक्‍यता आहे. वाढीच्या व पोटरीच्या अवस्थेतील ज्वारीवर तुरळक ठिकाणी मावा किडीचा प्रादूर्भाव आहे.

वाढ, कांडी धरणे व पोटरीच्या अवस्थेतील गव्हावर तुरळक प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादूर्भाव आहे. फूल, घाटे लागणे व घाटे भरण्याच्या अवस्थेतील हरभऱ्यावर घाटे अळीचा तुरळक प्रादूर्भाव आहे. वाढीच्या अवस्थेतील करडईवर मावा किडीचा प्रादूर्भाव आहे.

गहू, हरभऱ्याची अधिक पेरणी

लातूर कृषी विभागात गहू व हरभरा पिकाची सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक पेरणी झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २७ हजार ५७८ हेक्‍टर, तर १ लाख ३८ हजार २५० हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख १६ हजार १४० हेक्‍टर, तर ८ लाख ८० हजार ८५१ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ६५ हजार ७३२ हेक्‍टर, तर ३ लाख ३४ हजार ३८५ हेक्‍टरवर पेरणी, मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र २२ हजार ३४ हेक्‍टर, १६ हजार ८०६ हेक्‍टरवर पेरणी, करडईचे क्षेत्र ३६ हजार १६६ हेक्‍टर, १५ हजार २० हेक्‍टरवर पेरणी, जवस १००५ हेक्‍टरवर, तीळ १०१ हेक्‍टरवर, सूर्यफूल  ८६० हेक्‍टरवर, इतर तृणधान्य ३९९५ हेक्‍टरवर, इतर कडधान्य ४१ हजार २७५ हेक्‍टरवर, तर इतर गळीतधान्याची २७८४ हेक्‍टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com