नाशिक : अवकाळीचा द्राक्ष, कांदा उत्पादकांना मोठा फटका

नाशिक : अवकाळीचा द्राक्ष, कांदा उत्पादकांना मोठा फटका

नाशिक :  गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. रविवारी (ता. १४) दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत असताना अचानकपणे सायंकाळी पाच वाजता मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर, येवला, निफाड, इगतपुरी, चांदवड, देवळा तालुक्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष, कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला. शेतात साठवून ठेवलेल्या शेतमालाचे नुकसान झाले. काही ठिकाणी वाऱ्यामुळे चारा उडून गेला. अंगावर वीज पडल्याने चार ठिकाणी पशुधन मृत्युमुखी पडले. अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला शेतमाल भिजला. दरम्यान, सोमवारीदेखील (ता. १५) जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

नाशिकमध्ये वीजपुरवठा खंडित

पावसामुळे नाशिक शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. शहराच्या विविध भागांत झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, पुढील २४ तास जिल्ह्यात अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे. पंचवटीमधील आयुर्वेद रुग्णालयासमोरील भाजी मंडई, उपनगरासह इंदिरानगरसह उपनगरांमध्येही काही ठिकाणी झाडे कोसळली. दुसरीकडे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना काहीसा दिलासाही मिळाला. 

लासलगावात कांदा उत्पादकांना फटका

जिल्ह्यात निफाड तालुक्यात लासलगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. आठवडे बाजारात आलेल्या शेतकरीवर्गासह नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने द्राक्ष, कांदा उत्पादकांना फटका बसला आहे. 

नांदगावात चारा उडाला

नांदगाव तालुक्यात भालूर, सोयगाव, लोहशिंगवे, मोहेगाव, लक्ष्मीनगर परिसरात सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटल्याने वातावरणात धुळीचे लोट पसरले. अनेक शेतकऱ्यांचा जनावरांसाठी ठेवलेला चारा उडून गेला. तर कैऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. मनमाड शहर परिसरात सायंकाळी वादळी वारा, विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. त्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला. इगतपुरी तालुक्यात घोटी, वाडीवर्ऱ्ह, गोंदे आदी ठिकाणी पाऊस झाला.

शेतमालाचे नुकसान 

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात, कांदाचाळीत साठविण्यात आलेल्या कांद्याला फटका बसणार आहे. अंतिम टप्प्यात गव्हाची काढणी सुरू होती. मात्र, विविध ठिकाणी गहू पावसात भिजला. द्राक्षकाढणी हंगाम अंतिम टप्प्यात असताना द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. आंब्याचा मोहर, कैऱ्या गळाल्या. दुष्काळाचा सामना करत असताना अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले.

दूध संकलनावर परिणाम

पावसामुळे दूध संकलन केंद्रात सायंकाळी अनेक दूध उत्पादकांनी दूध संकलन केंद्रावर आणले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दूध संकलनास ५० टक्के फटका बसल्याचा अंदाज आहे. 

वीज पडून तीन तरुणांसह एक महिला ठार

दिंडोरी तालुक्यातील मानोरी येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या अनिल विश्‍वनाथ गवे (वय ३२), सागर गणपत गवे (वय १९) व रोहित हिरामण गायकवाड (१७) यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील केद्राई धरणाच्या शिवारात जनाबाई सुभाष रजाने (वय ३५) ही महिला ठार झाली. नाशिक तालुक्यातील पिंपळद येथे दोन गायी, तर शिवणई (ता. दिंडोरी) येथील यमुनाबाई गुंजाळ यांची एक गाय, येवल्यातील देवठाण येथील शिवनाथ जाधव यांची एक गाय ठार झाली.

कसबे सुकेणे येथे द्राक्षबाग जमीनदोस्त 

निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक किशोर मोगल यांची एक एकर द्राक्षबाग सायंकाळी सातच्या सुमारास वाऱ्यावादळामुळे जमीनदोस्त झाली. २०० क्विंटल उत्पन्न त्यांना अपेक्षित होते. त्यांचे मोठे नुकसान झाले. अलीकडेच ५० रुपये प्रतिकिलोने त्यांचा व्यवहार झाला होता. तलाठ्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com