मराठवाड्यात पिकांवर कीड, रोगांच्या प्रादुर्भावाचे संकट

औरंगाबाद : मराठवाड्यातील कपाशी, सोयाबीन, तूर मका या प्रमुख पिकांसह भाजीपाला व इतर पिकांवर सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांच्या प्रादुर्भावाचे संकट कायम आहे.
 Crisis of pests and diseases on crops in Marathwada
Crisis of pests and diseases on crops in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील कपाशी, सोयाबीन, तूर मका या प्रमुख पिकांसह भाजीपाला व इतर पिकांवर सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांच्या प्रादुर्भावाचे संकट कायम आहे. पावसाच्या संततधारीने काढणीला आलेल्या मुगाचे अनेक भागात नुकसान केले. हवामानाचा अंदाज पाहता पिकांवरील संकटाचे ढग अजूनही कायम असल्याची स्थिती आहे.

पाऊस कुठे अपेक्षितच्या पुढे जाऊन, तर कुठे समाधानकारक झाला आहे. परंतु, कीड व रोगांना कायम पोषक वातावरणामुळे जवळपास सर्वच पीक संकटात आहेत. कपाशीच्या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा तसेच काही प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून मरचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढले आहे. पिकाची वाढ ही जोरदार झाली असल्याने न मिळणारा वापसा, हवा खेळती न रहाणे आदी बाबीही संकटात वाढ करत आहेत. कपाशी पिकात पाते गळ वाढण्याचा धोकाही आहे.

वाढ बऱ्यापैकी झालेल्या सोयाबीनच्या पिकावर तंबाखूची पाने खाणारी अळी, चक्रीभुंगा, उंट अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. वाद्या किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकात शेंगांवरील करपा होण्याचाही धोका आहे.

जोमदार वाढ, ढगाळ वातावरण, जमिनीत असलेली ओल, वाढलेली आर्द्रता त्याचे संकेत देत आहे. तुरीच्या पिकात सततच्या पावसामुळे मरचा प्रकार वाढला. त्यासाठी शिफारसीत रसायनांच्या ड्रेंचिंगचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. याशिवाय पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भावही आढळून आल्याने तुरीच्या पिकावरील संकटाची चाहूल लागली आहे.

मूग-उडदाचे मोठे नुकसान

मुगाचे पीक काढणीला आले आहे. बहुतांशी भागात पोळ्याला काढणीला आलेल्या मुगाच्या पिकाचे गत काही दिवसांत सुरू असलेल्या संततधार पावसाने बऱ्यापैकी नुकसान केले आहे. उडदाचे पीक काढणीला येण्याला अजून जवळपास महिन्याचा अवधी आहे. दोन्ही पिकांच्या काढणीच्या वेळी पाऊस असाच कायम राहिल्यास नुकसानीत वाढ होण्याची चिंता शेतकऱ्यांना  आहे.

तज्ञांचा सल्ला

अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा, वापसा येताच कोळपणी, खुरपणी, वखरणी करावी, कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार युरिया, पालाश यांचा वापर करावा. कॉपर ऑक्सीक्लोराईडची आळवणी करावी. कापूस पिकामध्ये युरिया किंवा दोन टक्के  डाय अमोनिअम फॉस्फेटचा वापर करावा असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com