मुरुंब्यात कुक्कुटपालकांवर संकट

परभणी ः पक्षी उत्पादनक्षम अवस्थेत असताना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या शेतकऱ्यांवर मृत पक्ष्यांसोबतच जिवंत पक्षीदेखील गाडून टाकण्याची वेळ आली. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला खीळ बसली आहे.
Crisis on poultry farmers in Murumba
Crisis on poultry farmers in Murumba

परभणी ः सतत दुष्काळी स्थितीला सामोरे जात असलेल्या परभणी जिल्ह्यातील मुरुंबा (ता. परभणी) येथील तरुण अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी मोठ्या रकमेचे कर्ज काढून शेतीपूरक पोल्ट्री व्यवसाय सरू केला. परंतु पक्षी उत्पादनक्षम अवस्थेत असताना बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या शेतकऱ्यांवर मृत पक्ष्यांसोबतच जिवंत पक्षीदेखील गाडून टाकण्याची वेळ आली. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला खीळ बसली आहे. या व्यवसायात परत नव्या जोमाने उभे राहण्यासाठी शासनाकडून भरीव मदतीची अपेक्षा बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुरुंबा येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी विजयकुमार झाडे यांना केवळ दीड एकर जमिनीतून समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हते. काही वर्षांपूर्वी त्यांनी शेतामध्ये छोट्या स्वरूपात गावरान कोंबडीपालन सुरू केले. गेल्या काही वर्षांत त्यांना अंडी आणि पक्षी विक्रीतून चांगले उत्पन्न मिळू लागले. स्वतःच्या हिश्‍शाचे दोन लाख रुपये तेही कर्ज काढून आणि परभणी येथील एका बॅंकेकडून आठ लाख रुपये, असे भांडवल जमा करून शेतामध्ये गावरान कोंबडी आणि अंडी उत्पादन प्रकल्प सुरू केला.

गतवर्षीच्या शेतामध्ये पक्षी संगोपन निवारा उभारून सप्टेंबर महिन्यात १ हजार ८०० गावरान पक्ष्यांची पिले प्रतिनग १२५ रुपये दराने विकत घेऊन त्यांचे संगोपन सुरू केले. हे पक्षी प्रत्येकी सरासरी दोन किलो वजनाचे झाले होते. अंडी देण्याच्या अवस्थेत होते. परंतु शुक्रवारी (ता. ८) त्यातील काही पक्ष्यांचा मृत्यू झाला. शनिवार (ता. ९) आठशेच्या वर पक्षी मृत्युमुखी पडले. बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उर्वरित पक्षीदेखील नष्ट करावे लागले.

बालासाहेब चोपडे, संदीप झाडे, लक्ष्मण झाडे या तीन शेतकऱ्यांचे देखील सुमारे साडेपाच हजार पक्षी गाडून टाकण्याचे आदेश देण्यात आले. शासनाकडून प्रतिपक्षी ९० रुपये मदत दिली जाणार आहे. परंतु शेड उभारणी, पक्षी खरेदी, खाद्य यावर मोठी रक्कम खर्च झाली आहे. तोकड्या मदतीमुळे भरपाई शक्य नाही.

गतवर्षी कर्ज काढून कुक्कुटपालन व्यवसायाचा विस्तार केला. अठराशे पक्ष्यांचे संगोपन केले. परंतु पक्षी अंडी देण्याच्या अवस्थेत असताना बर्ड फ्लूची लागण होऊन मृत्युमुखी पडल्याने होत्याचे नव्हते झाले. कर्ज फेडीची चिंता आहे. शासनाकडून भरीव मदत मिळावी. अन्यथा मजुरीवर जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही. - विजयकुमार झाडे, कुक्कुटपालक शेतकरी, मुरुंबा, जि. परभणी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com