गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदल

राज्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने समृद्ध होण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. सरकारी धोरणात यापुढे गटशेतीला जास्त प्राधान्य राहील. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष गट पुढे नेतांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन निकष तयार करण्यावर आमचा भर आहे. - एकनाथ डवले, प्रधान सचिव (कृषी)
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदल
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदल

पुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ झटकण्यासाठी कृषी खात्याचे नवे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी गटशेतीमधील काही निकष बदलले आहेत. शेतकरी गटाचे अनुदान दहा टक्क्यांनी वाढवून ६० टक्के करण्यात आले आहे.  श्री. डवले यांनी गटशेतीच्या निकषांचा स्वतः अभ्यास करून काही बदल सुचविले आहेत. धोरणात्मक बदल करताना त्यांनी नाबार्ड, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी विभागातील अधिकारी वर्गाशी चर्चा केली. निकषात बदल करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष मार्गदर्शक सूचना तयार करताना त्या जास्तीत जास्त शेतकरीभिमुख होण्यासाठी थेट गटांशी चर्चा करण्याचे आदेश श्री. डवले यांनी दिले आहेत.  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून राज्यातील गटांना अंतिम मान्यता दिली जाईल.    विशेष म्हणजे चांगले काम करणाऱ्या राज्यस्तरीय शेतकरी गटाला २५ लाखांचे पहिले, दहा लाखांचे दुसरे आणि पाच लाखांचे तिसरे बक्षीसदेखील दिले जाणार आहे.

राज्याच्या गटशेतीचे समन्वयक अनिल बनसोडे म्हणाले की ‘‘शेतकरी गटांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी प्रधान सचिवांकडून पुन्हा गटांशी बोलणी केली जाणार आहे. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, गटशेतीचे अभ्यासक, गटांचे अध्यक्ष तसेच कृषी विभागाच्या उपविभागीय कृषी अधिका-यांची बैठक घेवून गटशेतीच्या मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार आहेत.’’ गटशेतीसाठी १०० कोटी रुपये अनुदान वाटण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यापैकी ७० कोटी रुपये कृषी खात्याला मिळाले असून, ते जिल्हा स्तरावरदेखील पाठविण्यात आलेले आहेत. एसएओऐवजी आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना गटाचे नोडल ऑफिसर करण्यात आले आहे.  राज्यात काही भागांत गटशेतीसाठी सलग क्षेत्र नसले तरी गट तयार होणार असून, जिल्हास्तरीय समितीसमोर तसे आराखडे आणून मंजुरी देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.  सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून बॅंकेच्या कर्जास पात्र ठरलेल्या तसेच मार्केटिंग कंपन्यांबरोबर करार केलेल्या आराखड्यांना अनुदानासाठी प्राधान्य मिळणार आहे.  गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी संस्थांना वार्षिक एक लाख रुपये दोन वर्षांपर्यंत दिले जाणार आहेत. गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांचीदेखील निवड करण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांवर देण्यात आलेली आहे.  प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या जोडीला मुखमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी या तिघांनीही गटशेतीमध्ये रस घेतला आहे. त्यामुळे गटशेतीचे धोरण पुढे नेण्यात क्षेत्रीय पातळीवर येणाऱ्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. अशी राहील गटशेतीची वाटचाल

  • प्रत्येक जिल्ह्यात किमा चार गट तयार होणार 
  • शेतकरी गटाला मिळणार ६० टक्के म्हणजे एक कोटीपर्यंत अनुदान
  • वैयक्तिक आणि गट अशा दोन्ही पातळ्यांवर अनुदानाची सुविधा 
  • प्रकल्प आराखड्याच्या किमान ७५ टक्के अनुदान गटाला 
  • वैयक्तिक प्रकल्प आराखड्यात योग्य बाब असल्यास कमाल २५ टक्के अनुदान मिळेल.
  • कृषी विभागाच्या इतर योजनांमधूनदेखील गटांना लाभ
  • योजनांचे अनुदान अपुरे असल्यास गटशेतीमधून अनुदान देण्याचे एसएओंना अधिकार 
  • गटात किमान २० शेतकरी व १०० एकर शेती हवी
  • कोकणात मात्र ५० एकर शेतीचादेखील गट तयार होणार 
  • सामूहिक वापरासाठी सर्व शेतकऱ्यांना आपापसांत सामंजस्य करार करावा लागेल
  • असे होणार अनुदानवाटप 

  • कृषी आयुक्तांकडून काही नमुना प्रकल्प अहवाल गटांना देतील. 
  • प्रत्येक गटाने एक किंवा दोन पिके किंवा व्यवसाय निवडण्याचे बंधन.
  • गटाला द्यावे लागेल नोंदणी प्रमाणपत्र, सभासद कार्यक्षेत्र नकाशा, बॅंक खाते तपशील, गटाचा प्राथमिक आराखडा, 
  • गटाची निवड एसएओ करतील. त्यानंतर एक महिन्यात गटाला डीपीआर द्यावा लागेल.
  • जिल्हाधिकाऱ्यांची समिती दोन आठवड्यांत डीपीआरला मान्यता देईल.
  • मान्यता दिलेले गटांचे प्रकल्प आराखडे बॅंकेकडे देण्याची व बॅंकर्स समितीकडे मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी एसएओची.
  • कर्जाच्या प्रमाणात बॅंकेत या गटांना आपला सहभाग जमा केल्यावर एसएओकडून कामाच्या प्रगतीप्रमाणे अनुदान मिळेल. 
  • कशासाठी मिळेल अनुदान  सामूहिक विहीर, शेततळे, पाइपलाइन, स्वयंचलित सिंचन यंत्रणा, सूक्ष्म सिंचन युनिट, अवजारे, यंत्रसामग्री, सामूहिक गोठा, स्लरी युनिट, गांडूळ शेड, कंपोस्ट युनिट, मुरघास युनिट, अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी जाळ्या, दूध संकलन व प्रक्रिया संयत्र, सामूहिक पॉलिहाउस व शेडनेट, शेतीमाल संकलन-साठवणूक-प्रक्रिया केंद्रांची मशिनरी, पॅकिंग, ब्रॅंडिग युनिट, रेफर व्हॅन.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com