वीजतोडणीमुळे पिकांना फटका

गेल्या वर्षभरापासून एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना आता वीज कंपनीने थकीत वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली आहे.
2PNE17M97798.jpg
2PNE17M97798.jpg

अकोला ः गेल्या वर्षभरापासून एकीकडे कोरोनाचे संकट कायम असताना आता वीज कंपनीने थकीत वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हातात घेतली आहे. गहू, कांदा, मका, भाजीपाला पिके तसेच फळबागा पिकांना वाढत्या उन्हामुळे सिंचनाची आवश्‍यकता आहे. त्यातच महावितरणने वीजकपातीची मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

महावितरणची शेतकऱ्यांकडे देयके थकल्याने पैसे वसुलीसाठी सध्या मोहीम उघडण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याकडे थकलेले वीजबिल भरण्याबाबत आवाहन केले जात आहे. गेल्या आठवड्यात अधिवेशन काळात शासनाने या मोहिमेला स्थगिती दिली होती. त्यानंतर अधिवेशन संपताच ही स्थगिती उठविण्यात आली. मागील तीन दिवसांपासून महावितरणची वसुली यंत्रणा गावोगावी सक्रिय झाली आहे. सध्या जिल्ह्यात उन्हाळी पिके, बारमाही बागायती पिके उभी आहेत. उन्हाच्या झळा वाढल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढत आहे. 

जिल्ह्यात अकोट, पातूर, तेल्हारा व इतर तालुक्यांतील कृषिपपांचा विद्युतपुरवठा महावितरणतर्फे खंडित केला जात आहे. तेल्हारा तालुक्यात कृषिपपांचे १५ कोटी २४ लाख थकीत असल्याने शुक्रवारी (ता. १२) कृषिपंपांचा विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील गहू, कांदा, भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे. तेल्हारा तालुक्यात १३ हजार ६०८ कृषिपंपांच्या विद्युतजोडणी आहेत. या कृषिपंपांचे शेतकऱ्यांकडे १५ कोटी २४ लाखांची देयके थकीत आहेत. शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे थकीत देयके न भरल्याने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता विद्युत पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली. सध्या शेतात कांदा बियाणे, गहू, मका आदी पिके आहेत. उन्‍हाचा पार वाढत असल्याने या पिकांना पाण्याची गरज आहे. असे असताना ऐनवेळी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी विद्युतपुरवठा खंडित करण्यात सुरुवात केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

अकोट तालुक्यातील बोर्डी परिसरात गुरुवारी (ता.११) दुपारी ४ वाजता गावामधून शेतात जाणारे थ्री फेज कनेक्शन शेतात कापण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. १२) सकाळी ते पूर्ववत सुरू करण्यात आले. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी पैशांचा भरणा करतील त्यांचेच वीज रोहित्र सुरू ठेवण्यात येईल. जे शेतकरी पैसे देणार नाहीत त्यांचा पुरवठा खंडित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

किन्हीराजामध्येही वीज तोडली  वाशीम जिल्ह्यातील किन्हीराजा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या किन्हीराजा, एरंडा, मैराळडोहसह इतर गावांतील शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा कापण्यात आला आहे. विजेअभावी भुईमूग, उन्हाळी मूग, ज्वारी, भाजीपाला पिकांवर गंडांतर आले आहे. कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता जोडणी तोडल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. किन्हीराजा परिसरात आधीच वीजपुरवठा सुरळीत राहत नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीत पीक घेताना मोठी अडचण निर्माण झाली होती. वरिष्ठांकडून आलेल्या आदेशामुळे ही कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वीजबिलाची काही रक्कम भरली असून, काही शिल्लक आहे. ५० टक्के वीजबिलाविषयी माहिती दिली नव्हती. त्यातच वीजपुरवठा खंडित केला. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.  प्रतिक्रिया  थकबाकी वाढली असल्याने शेतकऱ्यांनी कृषी धोरणानुसार शेती पंपांची देयके भरून वीज वितरणला सहकार्य करावे.  - अनिल उईके, कार्यकारी अभियंता, आकोट  महावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडणे सुरु केले आहे. शेतकरी आधीच कोरोना लॉकडाउनमुळे त्रस्त झालेला आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, ग्राहकांची वीजजोडणी तोडल्यास होणाऱ्या नुकसानास महावितरण जबाबदार असेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल. आम्ही महावितरण कार्यालयाची वीज तोडण्यास प्रसंगी मागे पाहणार नाही. याबाबत शुक्रवारी (ता. १२) अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.  - दामोदर इंगोले, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वाशीम 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com