कोसळली घरे, बुडाले संसार, पिके गेली वाया

पीक नुकसान
पीक नुकसान

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, जसा पूर ओसरत आहे तशी परिस्थितीची भयानकता दिसू लागली. मरून पडलेली जनावरे, कोसळलेली घरे, बुडालेले संसार आणि पिके पाहताना पाहून ग्रामस्थांना अश्रू अनावर होत आहेत. कोट्यवधी रुपयांचे नुकसान आता ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना असह्य होत आहे.  सांगली जिल्ह्यात पुरामुळे पाच तालुक्‍यांतील तब्बल ५८ ते ६० हजार हेक्‍टरवरील ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका, फुलांचे सरासरी एकरी पंचवीस हजार रुपयांप्रमाणे नुकसान झाल्याचे मानले तरी सुमारे ३७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या अनेक भागातील शेतात पाणी असल्याने बाधित झालेले क्षेत्र वाढण्याची शक्‍यता असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील कृष्णा-वारणा नदीकाठाशेजारी १०७ गावे आहेत. वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्‍यातील नदीपात्राशेजारील शेती असणाऱ्या गावांची संख्या १३७ हून अधिक आहे;  तसेच अनेक ठिकाणी सखल भागांतील शेतात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पाण्यात असल्याने कुजली आहेत; तर काही ठिकाणची शेतजमीन पुरामुळे वाहून गेली आहे. सांगलीत महापुराचे पाणी ओसरले असून महापालिका क्षेत्रात आता स्वच्छतेचे काम वेगाने सुरू झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात स्वच्छता सुरू झाली आहे. आयर्विन पुलाजवळील पाण्याची पातळी ५० फूट इतकी झाली असून एक दिवसात ४ फूट पाणी कमी झाले आहे. पुराचे पाणी शहरात आले त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण आले असल्याने महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.  कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी रविवारी सकाळी दुपारी दोन वाजता ४८ फूट होती, एकूण ८४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आजअखेर ८.२१ टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.  दरम्यान, जिल्ह्यांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. राजकीय नेतेही पूरग्रस्त भागाला भेट देत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे भेट दिली. मदतकार्यासाठी सरसावले नागरिक

  • सांगली जिल्ह्यात १४ हजार ८९१ लोकांवर औषधोपचार
  • सांगलीत ४२ हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन
  • सांगलीतील पूरग्रस्त गावांपैकी १७ गावांना बोटीने संपर्क 
  • जनावरांसाठी सांगलीत ३० टन चारा वाटप
  • शासनातर्फे २५० गावात होणार स्वच्छता मोहीम
  • अनेक रस्ते सुरु

  • सांगली- तासगाव मार्ग सुरू
  • पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सुरू
  • कोल्हापुरातील उत्तुर ते आजरा मार्गावरील व्हिक्टोरीया पुल खुला 
  • सांगलीत रस्त्यांचे १८६ कोटी २५ लाखाचे नुकसान 
  • कोल्हापूर- सांगली मार्ग अवजड वाहनांसाठी सुरू
  • पुरानंतरची भीषणता

  •   पूर ओसरल्याने घाणीचे साम्राज्य 
  •   घरांमध्ये साप आणि विंचूसह विषारी प्राण्यांचा वावर
  •   वर्षभरासाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान
  •   घरातील सर्व जीवनाश्‍यक वस्तूंचे नुकसान
  •   हजारो घरांची पडझड
  •   हजारो जनावरे वाहून गेली
  •   पुरात दगावलेली जनावरे गावांतच पडून
  •   बैलगाडी, शेती औजारांसह उपयोगी साहित्य गेले वाहून
  •   कृषी निविष्ठांचे पाण्यामुळे नुकसान  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com