मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक परिस्थिती

मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या बरोबरच पीक पेरणीची एकूण स्थिती यांचा आढावा या लेखात घेतला आहे. सतत ढगाळ वातावरणाचे पिकांवर होणारे परिणाम जाणून घेऊ.
infestation of  Aphis gossypii on green gram and black gram
infestation of Aphis gossypii on green gram and black gram

मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या बरोबरच पीक पेरणीची एकूण स्थिती यांचा आढावा या लेखात घेतला आहे. सतत ढगाळ वातावरणाचे पिकांवर होणारे परिणाम जाणून घेऊ. मराठवाड्याचे कार्यक्षेत्र १७ अंश ३५अंश ते २०अंश ४० अंश उत्तर अक्षांश आणि ७४अंश ४०अंश ते ७८अंश १५अंश पूर्व रेखांश असे आहे. त्यात औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड आणि उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. समुद्र सपाटीपासूनची उंची ३०० ते ९०० मीटर असून हा संपूर्ण विभाग दख्खनच्या पठारात मोडतो. मराठवाड्याचे हवामान सर्व साधारणपणे कोरडे व उष्ण आहे. मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८१४.२ मिमी तर सरासरी खरीप हंगामातील (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान ६७८.९ मिमी आहे. एकूण वार्षिक पावसांपैकी जवळपास ८० ते ८५ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. मराठवाड्यातील जमीन ज्वालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या बेसॉल्ट खडकापासून बनलेल्या आहेत. खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, मूग, खरीप ज्वारी, उडीद, मका इ. पिके घेतली  जातात.  मराठवाड्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६४ लाख हेक्टर असून, यापैकी पिकाखालील एकूण क्षेत्र ५७ लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या ७५ टक्के इतके आहे. एकूण पिकाखालील क्षेत्रांपैकी कोरडवाहूचे क्षेत्र एकूण ४५.६० लाख असून मराठवाड्यातील एकूण पिकाखालील क्षेत्रांपैकी एकूण ८७ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. कोरडवाहू क्षेत्रातील पीक हे मुख्यत्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पिकांची योग्य प्रकारे वाढ व विकास होऊन चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्यासाठी हवामान व पर्जन्यमान खूप महत्त्वाचे घटक आहेत. जवळपास पिकांचे ५० टक्के उत्पादन हे हवामान व पर्जन्यमान या घटकावर अवलंबून असते. हवामान व पर्जन्यमान  मराठवाड्यात १२ जून २०२० रोजी मॉन्सूनचे आगमन झाले. काही तालुके वगळता १४ जून २०२० पर्यंत मॉन्सूनने संपूर्ण मराठवाडा व्यापला. जून ते जुलै या कालावधीत मराठवाड्यात आकाश ढगाळ होते. औरंगाबाद विभागात बहुतांश ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. लातूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्‍या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.  तसे पाहता या वर्षी जून ते जुलै महिन्यात पर्जन्यमानाची नोंद चांगली झाली आहे.  पर्जन्यमान १ जून ते ३१ जुलै या कालावधीमधील मराठवाड्यातील सरासरी पर्जन्यमान ३२०.२ मिमी असून ३१ जुलै पर्यंत ४१०.२ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. म्हणजेच सरासरीच्या १२८.१ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी ३१ जुलै अखेर २४४.९ मिमी  म्हणजेच सरासरीच्या ७५.९ टक्केच पर्जन्यमानाची नोंद झाली होती. पीक परिस्थिती व उपाययोजना 

  • एकंदरीत यावर्षी मराठवाड्यातील बहुतांशी भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा असून खरीप पिकाची वाढ चांगली झाली आहे. यावर्षी मराठवाड्यातील खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या परिस्थितीचा विचार केल्यास एकूण तृणधान्याचे क्षेत्र ४.२ लाख हेक्टर (जे सरासरीच्या ६६ टक्के), कडधान्य ७.४ लाख हेक्टर (सरासरीच्या ८५ टक्के), एकूण अन्नधान्य ११.६ लाख हेक्टर (सरासरीच्या ७७ टक्के), गळीत धान्य २०.१ लाख हेक्टर (सरासरीच्या ११८ टक्के), तर कापसाचे १४.५ लाख हेक्टर (सरासरीच्या ९१ टक्के) आहे. 
  • एकूण खरीप पिकाचे पेरणी क्षेत्र ५७.८ लाख हेक्टर असून (जे सरासरीच्या उणे ९ टक्के) आहे. यावर्षी मराठवाड्यामध्ये गळीत धान्य पिकाचे पेरणी क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त आहे.
  • या हवामानाचे परिणाम 

  • मागील दोन महिन्यात सतत ढगाळ वातावरण, दमट हवा व अति पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 
  • मराठवाडा विभागात मका, तूर, बाजरी व भुईमूग हे पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे.
  • मूग, उडीद पिके वाढ ते फुलोरा अवस्थेत तर काही ठिकाणी शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत. उडीद व मूग पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
  • सोयाबीन पीक वाढ ते फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. सतत ढगाळ व दमट वातावरण राहिल्यामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, उंट अळी व खोड किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे.
  • कापूस पीक फांद्या फुटणे ते पाते धरणे तर काही ठिकाणी फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
  • उपाययोजना 

  • सध्याच्या हवामानाचा अंदाज घेता पावसाने उघडीप दिल्यास रोग व किडीच्या व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन व शिफारशीनुसार बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. 
  • आंतरमशागतीचे  कामे करून पीक तणमुक्त करावे. 
  • येत्या काळात जास्त पाऊस झाल्यास पिकात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी. 
  • पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे दिसून येत असल्यास तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेऊन संबंधित विद्राव्य खतांची फवारणी करावी. 
  • तापमानाचा व पाण्याचा ताण बसल्यास पिकांच्या वाढीवर आणि पीक फुलोऱ्यात असताना वाईट परिणाम होतो. पीक फुलोऱ्यावर असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा आवश्यक असतो. 
  • येत्या काळात पावसाने उघडीप दिल्यास या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फळधारणा न होणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यामुळे या काळात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
  • मराठवाड्यात १ जून ते ३१ जुलै अखेरीस सरासरीच्या तुलनेत  प्रत्यक्ष पडलेल्या  पावसानुसार (प्रागतिक) तालुक्याची वर्गवारी 
    पर्जन्यमान टक्केवारी तालुक्याची संख्या तालुक्याचे नाव  
    ० ते २५ टक्के -- --
    २६ ते ५० टक्के -- --
    ५१ ते ७५ टक्के नांदेड जिल्हा-  माहूर, किनवट. उस्मानाबाद जिल्हा- तुळजापूर
    ७६ ते १०० टक्के १५ लातूर जिल्हा- लातूर, चाकूर. नांदेड जिल्हा-  बिलोली, कंधार, हदगांव, भोकर, देगलूर, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी. उस्मानाबाद जिल्हा-  उस्मानाबाद, परंडा, भुम, लोहरा.
    १०० टक्के पेक्षा जास्त ५६ औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगांव, फुलंब्री. बीड जिल्हा-  बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगांव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, अडवणी, शिरूर कासार. हिंगोली जिल्हा-  हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा, शेणगांव. जालना जिल्हा-  भोकरदन, जाफराबाद, जालना, अंबड, परतूर, बदनापूर, घनसावंगी, मंठा. लातूर जिल्हा-  औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, रेणापूर, देवणी, जळकोट, शरुर अनंतपाळ. नांदेड जिल्हा-  नांदेड, लोहा, अर्धापूर, नायगांव (खै), मुखेड. उस्मानाबाद जिल्हा : कळंब, वाशी, उमरगा. परभणी जिल्हा-   परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत.

    (मराठवाड्यात ३१ जुलै अखेरीस पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत एकूण ७६ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात ५१ ते ७५ टक्के, १५ तालुक्यांत ७६ ते १०० टक्के तर ५८ तालुक्यांत १०० टक्के पेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली.) संपर्क- डॉ. के. के. डाखोरे, ९४०९५४८२०२ (अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com