मराठवाड्यात २५ लाख हेक्‍टरवर पिकांचे नुकसान

एकामागून एक नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या मराठवाड्यामध्ये शेती पिकांचे बाधित क्षेत्र २५ लाख ९८ हजार २१३ हेक्टरवर पोहोचले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Crop damage on 25 lakh hectares in Marathwada
Crop damage on 25 lakh hectares in Marathwada

औरंगाबाद : एकामागून एक नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या मराठवाड्यामध्ये शेती पिकांचे बाधित क्षेत्र २५ लाख ९८ हजार २१३ हेक्टरवर पोहोचले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २७ व २८ सप्टेंबर या दोन दिवसांत तब्बल १० लाख ५६ हजार ८४८ हेक्टर बाधित क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. तर १ जून ते २८ सप्टेंबर दरम्यान जवळपास २२५४ कोटी ११ लाख ७५ हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

आधीच्या नैसर्गिक आपत्तीतून सावरत नाही व त्या नुकसानीची पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसऱ्या नैसर्गिक आपत्तीचे आघात टप्प्याटप्प्याने मराठवाड्यावर झाले. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत मिळून १ जून ते २८ सप्टेंबर दरम्यान ३५ लाख ६४ हजार ३९१ शेतकऱ्यांचे २५ लाख ९८ हजार २१३ हेक्‍टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले. जवळपास ४३९० किलोमीटरच्या रस्त्यांचे नुकसान झाले असून १०७७ पूल वाहून गेले आहेत. जवळपास ११६ शासकीय इमारतींनाही मराठवाड्यातील नैसर्गिक जलप्रकोपचा दणका बसला आहे. ७१ जिल्हा परिषदेच्या शाळांचे नुकसान झाले असून, २०५ तलाव फुटण्याच्या घटना ही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. महावितरणच्या ३११६ ठिकाणच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. 

आजपर्यंत जवळपास २२ व्यक्तींना मराठवाड्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपला जीव गमवावा लागला आहे. ३१९ दुधाळ लहान, मोठी जनावरे मयत झाली असून लहान-मोठे ओढकाम करणारे जवळपास ७४ जनावरे, तसेच ७२ कोंबड्या या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडल्या आहेत. पक्क्या व कच्चा मिळून १४ घरांची पूर्णतः पडझड झाली.  जवळपास २०७२ कच्च्या- पक्क्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. मराठवाड्यात पूररेषेतील रेड लाइनवर असलेल्या गावांची संख्या ४४० तर ब्ल्यू लाइनवर असलेल्या गावांची संख्या ९७ आहे. जून ते २८ सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत ९ गावांना पुराने वेढले होते, तर १०४ गावांचा संपर्क तुटला होता. जवळपास ७७७ व्यक्ती पुरात अडकलेल्या होत्या, तर ११०१ व्यक्तींना पुराचा संभाव्य धोका ओळखून स्थलांतरित करण्यात  आले होते. 

अपेक्षित निधी १ जून ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार बाधित झालेल्या शेतीपिकांचे क्षेत्रासाठी १७९६ कोटी, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३४१ कोटी ३७ लाख ८९ हजार, वाहून गेलेल्या पुलांसाठी ४५ कोटी ३३ लाख ७५ हजार, शासकीय इमारतींसाठी ६ कोटी १ लाख २० हजार, जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी २ कोटी ४५ लाख ८० हजार तलावासाठी ५५ कोटी ७७ लाख ११ हजार, महावितरणच्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीपोटी ३ कोटी ४ लाख १६ हजार ४००, मृत व्यक्तींच्या वारसांना मदतीसाठी ८८ लाख, मयत दुधाळ जनावरांच्या भरपाईसाठी ५६ लाख ५४ हजार, ओढ काम करणाऱ्या लहान मोठ्या जनावरांच्या मृत्यूपोटी १५ लाख ८४ हजार, मृत कोंबड्यासाठी ३६००, घरांच्या पूर्णतः पडझडीपोटी १३ लाख ३० हजार, अंशतः पडझडीसाठी १ कोटी २४ लाख ३२ हजारांचा निधी अपेक्षित असल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.

पावसाची उसंत मराठवाड्यात गुरुवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत व त्यानंतर गुरुवारी दुपारपर्यंत बहुतांशी भागात पावसाने उसंत घेतल्याची चित्र आहे. बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद या तीन जिल्ह्यांत काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी वगळता गुरुवारी सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले. जूनपासून आतापर्यंत मराठवाड्यात सरासरी ६७९.५ मिलिमीटर पाऊस पडतो. त्या तुलनेत प्रत्यक्षात सरासरी १०२०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com