विदर्भात अवकाळी, गारपिटीने पिकांचे नुकसान
विदर्भात अवकाळी, गारपिटीने पिकांचे नुकसान

विदर्भात अवकाळी, गारपिटीने पिकांचे नुकसान

नागपूर ः पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस, गारपिटीने गहू, हरभऱ्यासह भाजीपाल्याला फटका बसला आहे. भंडारा गोंदियात २३८ हेक्‍टर बाधित क्षेत्राची नोंद प्राथमिक स्तरावर करण्यात आली असली तरी हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याचे सांगितले जाते. पश्‍चिम विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्‍या पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची शक्‍यता कृषी विभागाने फेटाळली आहे. उलट हा पाऊस पिकांसाठी पोषक ठरल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे.  पूर्व विदर्भातील, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यासह पश्‍चिम विदर्भातील अमरावती, वर्धा जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्‍यात गारपीट झाली. गारपीट आणि पावसामुळे मोहाडी तालुक्‍यात सर्वाधिक २३८.९० हेक्‍टर नुकसान झाल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यमाध्ये गहू ९८, हरभरा ४०, लाखोळी ७९.५० तसेच भाजीपाला २१.४० हेक्‍टर याप्रमाणे आहे. नागपूर, वर्धा जिल्ह्याच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गहू आडवा झाला. त्याचा थेट उत्पादकतेवर परिणाम होणार असल्याने सर्वेक्षणाची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १४५.९० मिमी. पावसाची नोंद झाली. त्यामध्ये सर्वाधिक पारशिवणी तालुक्‍यात १६ मिमी., सावनेर तालुक्‍यात १६.६, नागपूर शहर व ग्रामीणमध्ये १३.६, रामटेक १३.४, हिंगणा १०.४, भिवापूर ९, कुही १६.४ याप्रमाणे पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातदेखील पावसामुळे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. अमरावती जिल्ह्यात २ ते ३ मिमी. इतकाच पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान झाले नसल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. 

पाऊस मिलिमीटर भंडारा ः ११.६२ मोहाडी ः १३.४५ तुमसर ९.८  पवनी ४.५२ साकोली ५.०३  लाखांदूर ३.७३ लाखनी ६.४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com