नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसामुळे पिकांचे नुकसान

नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसामुळे पिकांचे नुकसान
नांदेड, परभणी, हिंगोलीत पावसामुळे पिकांचे नुकसान

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ पर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध तालुक्यात वादळी वारे, विजांच्या कडकडात अवकाळी पाऊस झाला. अनेक तालुक्यात गारपीट झाली. यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, हळद आदी पिकांसोबत आंबा, लिंबू आदी फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद (ता. मुखेड) मंडळामध्ये सर्वाधिक १५ मिमी पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड (२.५७ मिमी), हिमायतनगर (१.६७ मिमी), देगलूर (१ मिमी), किनवट (१.४३ मिमी), हदगाव (१ मिमी), अर्धापूर (०.३३ मिमी) या सहा तालुक्यांसह अन्य काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. 

परभणी जिल्ह्यातील हिस्सी (ता. सेलू) येथे गुरुवारी (ता. ४) दुपारी गारपीट झाली. परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. 

वादळी वाऱ्यामुळे आंबा, लिंबू या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राधेधामनगाव, डासाळा, सेलू (ता. सेलू) आदी गावशिवारातील लिंबू गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सध्या या तीनही जिल्ह्यांत गहू, ज्वारी, हरभरा तसेच हळद काढणीची कामे सुरू आहेत. शिजवलेली हळद शेतामध्ये वाळवत ठेवली आहे. गुरुवारी आलेल्या पावसामुळे वाळवत ठेवलेली हळद भिजून खराब झाली. दुष्काळी स्थितीत हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वादळी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा तुटल्याने अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com