मराठवाड्यात वादळासह पिकांना पावसाचा तडाखा

तालुक्यात काढणी झालेल्या व काढणीस आलेल्या शाळू ज्वारी, गहू, हरभरा पिकाचे नुकसान झाले असून महसूल, कृषी विभाग व पंचायत समितीचे कर्मचारी गावोगावी जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करीत आहेत. शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी याकरिता मागणी लावून धरणार आहे. — शिल्पा पवार, सभापती, पंचायत समिती, मंठा
crop damage
crop damage

औरंगाबाद  ः मराठवाड्यात ठिकठिकाणी बुधवारी (ता. १८) रात्री उशिरा व गुरुवारी (ता. १९) पहाटे दीड वाजताच्या सुमारास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पूर्वमोसमी पाऊस आणि गारपीट झाली. पाच जिल्ह्यांत जवळपास ६० मंडळांत हजेरी लावणाऱ्या या पावसामुळे रब्बीतील पिकांना मोठा फटका बसला. मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा कहर सतत तीन दिवसांपासून कायम आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील जवळपास ६० पेक्षा जास्त मंडळांत पाऊस झाला. काही मंडळांत गारपीट तर काही मंडळांत विजांचा कडकडाट व वादळासह पाऊस असे या पावसाचा स्वरूप होते. यंदा तीन ते चार टप्प्यात रब्बीची पेरणी झाली. त्यामुळे अजूनही अनेक भागातील रब्बीची पिके एक तर काढणीला आली आहेत किंवा काही सोंगून पडली आहेत. या पिकांचं या पावसानं व गारपिटीनं मोठं नुकसान केलं आहे. आंब्यासह द्राक्ष व इतर फळपिकांनाही मोठा फटका या अवकाळी पावसाचा बसतो आहे.  बीड जिल्हा बीड जिल्ह्यात सोमवारपासून (ता. १६) पावसाची हजेरी लागते आहे. बुधवारीही (ता. १८) बीड जिल्ह्यातील ११ मंडळांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेवराई तालुक्‍यात गारपीट झाली, तर वीज पडून गाय, बैल दगावले. धारूर तालुक्‍यात वीज पडून एक शेतकरी भाजला आहे. अंबाजोगाई व परळी तालुक्‍यांतील काही भागांत गारपीट झाली. परळी तालुक्‍यातील मांडखेल येथे वीज पडून सुधाकर नागरगोजे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पूस (ता. अंबाजोगाई) येथे वीज पडून एक गाय दगावली.  लातूर जिल्हा लातूर परिसरात बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह हलक्‍या पावसाने हजेरी लावली. उदगीर, रेणापूर, चाकूर, लातूर आदी तालुक्‍यात पावसाचा जोर अधिक होता. बेलकुंड, रोहिणा, जानवळ (ता. चाकूर) येथे वादळी वाऱ्यासह सरी कोसळल्या. जळकोट शहर व परिसरात दुपारी साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह काही काळ सरी कोसळल्या. रेणापूर तालुक्‍यातील पानगाव, भंडारवाडी, पाथरवाडी, गोविंदनगर, चुकारवाडी, कामखेडा, रामवाडी, फावडेवाडी, मुसळेवाडी, नरवटवाडी आदी गावांत दुपारी तीनच्या सुमारास काही काळ सरी कोसळल्या. उस्मानाबाद जिल्हा जिल्ह्यातील ८ मंडळांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पाऊस झाला. यामध्ये उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्‍यातील प्रत्येकी एक, कळंब व उमरगा तालुक्‍यातील प्रत्येकी तीन मंडळांचा समावेश आहे. कळंब तालुक्‍यातील शिराढोन मंडळात सर्वाधिक १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कळंब तालुक्‍यातील काही गावांत पावसासह गारपीट झाली. खामसवाडी, येरमाळा, तेरखेडा (ता. वाशी) परिसरातही वादळी पाऊस झाला. उमरगा शहर व तालुक्‍यात तसेच तुरोरीसह परिसरात मध्यरात्री मेघगर्जनेसह गारपीट व पाऊस झाला. वादळामुळे तुळजापूर तालुक्‍यातील सावरगाव येथे आनंदराव पाटील, रविकिरण पाटील यांची तीन एकर क्षेत्रातील द्राक्षबाग आडवी झाली.  जालना व औरंगाबाद जिल्हा जिल्ह्यातील ८ मंडळांत गुरुवारी सकाळपर्यंत हजेरी लावली. त्यामध्ये जालना व परतूर तालुक्‍यातील प्रत्येकी दोन, अंबड तालुक्‍यातील एक व मंठा तालुक्‍यातील तीन मंडळाचा समावेश आहे. मंठा परिसरातही झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्‍यातील केंधळी येथे झालेल्या गारपिटीने शेतकरी प्रल्हादराव बोराडे यांच्या टरबूज पिक उद्‌ध्वस्त झाले. औरंगाबाद  जिल्ह्यातील केवळ चार मंडळात अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये गंगापूरमधील दोन व वैजापूरमधील दोन मंडळांचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com