agriculture news in Marathi crop damage by rain Maharashtra | Page 2 ||| Agrowon

व्यथा लई गंभीर हाय, पण करावंच लागतं !

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं मारलं. पोळ्याच्या पावसानंतर त्याची झाडझूड झाली. मुगाची दातावर मारायला शेंग भेटली नाही. तूर उबाळायच्या पायथ्यावर आहे.

बीड: यंदा ऊस सोडून काहीच नाही. सोयाबीन पावसानं मारलं. पोळ्याच्या पावसानंतर त्याची झाडझूड झाली. मुगाची दातावर मारायला शेंग भेटली नाही. तूर उबाळायच्या पायथ्यावर आहे. येईल त येईल, करणार तरी काय? शेतकऱ्याची व्यथा लय गंभीर आहे, खामगाव (ता. गेवराई) येथील भाऊसाहेब निंबाळकर यंदा पावसाने केलेली दैन मांडत होते.

भाऊसाहेब म्हणाले, की दोन बॅग सोयाबीन पेरलं व्हत. साडेचार हजाराच्या बियाणे बॅगा, एक वेळ खत टाकलं, दोन वेळा खुरपणी केली, त्यानंतर काढणी, मळणी. मळणीला दीडशे रुपये गोणीचे दर द्यावे लागले. एवढं करून झालेल्या उत्पादनातून हाती मजुरी अन् जनावरांचं तेवढ भूस उरलं. मुगावर दहा अकरा हजार खर्च झाले अन् डाळी पुरता दोन पायल्या मूग झाला. खरिपाची स्थिती बिकट पण शेतकऱ्याला पर्याय नसल्याने शेती करावीच लागती. मागचे घेऊन या आणि पुढे लावा, शेतकऱ्याचं अस हाय. लावल्याशिवाय पिकत नाही. आता झाली ४० रुपये किलो ज्वारी. ती आणावीच लागते आणि मातीत मिसळावी लागते. आला पाऊस त झाल, अन् नाही झाला त गेलं, काय करावं.

रितेश घमाट म्हणाले, की ५० एकर शेती त्यात ऊस, कापूस, सोयाबीन, तूर हे पीक. तीन एकर सोयाबीन झिरो झालंय. उरलेल्या पाच एकरात काय होईल ते सांगता येत नाही. आजवर १२ क्विंटल कापूस तेवढा पहिल्या वेचणीत हातात आलाय. दुसऱ्या वेचणीत तो संपून जाईल. ऊस पण आडवा झाल्याने त्याचे वजन घटले. आणखी तीन-चार महिने तरी त्याच्या कापणीला लागतील.

उसाला फुटले पानसे
सावळेश्वर (ता गेवराई) येथील शरद अबुज म्हणाले, की अतिपावसाने तीन एकरातील ऊस, कापूस, सोयाबीनची वाताहत झाली. ऊस आडवा पडून त्याला पानसे फुटलेत. त्यामुळे उसाचे वजन येणार नाही. त्याला उंदीर लागत आहेत. पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेईना. मजूर भेटत नाही, मशीन चालत नाही त्यामुळे ऊस काढण्याचे अवघडच झाले. एक बॅग कपाशी तून तीन क्विंटल कापूस हाती आलाय. कापूस वेचण्याची मजुरी १२ ते १५ रुपये प्रति किलोवर पोचली. शेती कष्टाला पुरना काय करावं.
बीड जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ३६ हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर यंदा अतिपावसाने शेती पिकाचं मोठं नुकसान केलं असल्याचा प्रशासनाचा अहवाल आहे.

लाखभर खर्च अन् झाला साडेतीन क्विंटल कापूस
सावळेश्वर (ता. गेवराई) येथीलच नारायण अबुज म्हणाले, सात एकर शेतीत ऊस, कापूस ही दोनच पिके घेतली. तीन एकर कपाशीतून साडेतीन क्विंटल कापूस घरी आलाय. ऊस व कापूस मिळून पिकावर यंदा लाखभर रुपये शेतीवर खर्च झाले. त्यातून आजवर पंधरा-सोळा हजाराचा कापूस तेवढा हाती आलाय. मागच्या वर्षी तीन बॅगला अठरा क्विंटल कापूस झाला होता. यंदा पाच क्विंटलच्या पुढे जाईल असं वाटत नाही. कापूस वेचणीचे मजुरी दर प्रति किलो दहा रुपयांच्या पुढेच बोला. तरी मजूर मिळेना त्यामुळं आता घरचेच सर्व वेचणीला भिडलोय.

प्रतिक्रिया
जिथं दहा टन पपई व्हायची अपेक्षा होती. तिथं पाच टन होतेय. दरही कमी मिळत असल्यानं जवळपास दहा महिने सांभाळलेल्या पपईचा खर्च ३० हजार व उत्पन्न ४० हजार अशी अवस्था आहे. इतर पिकाचा खर्च आणि उत्पन्नाचे गणित न केलेलच बरं.
- सिद्धेश्वर पुरी, सावळेश्वर, ता. गेवराई, जि बीड.


इतर अॅग्रो विशेष
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
‘व्हीएसआय’च्या जालना केंद्रासाठी ३० कोटीपुणे ः विदर्भ, मराठवाड्याला मार्गदर्शक ठरणाऱ्या...