पावसामुळे पिके संकटाच्या फेऱ्यात 

राज्यात मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.
rain damage
rain damage

पुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह, द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे ऊसतोडणी प्रभावित झाली असून, गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. तर हरभरा आणि गहू पिकावर कीड-रोग वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकावा होत आहे. बुधवारी (ता. ६) कोल्हापूर, नगर, सातारा, गुरुवारी (ता. ७) नाशिक, पुणे भागांत हलका पाऊस पडला. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी मंडळात 50 मिलिमीटर, बोरोळ मंडळात 33 मिलिमीटर पाऊस झाला. याचा परिणाम हरभरा, ज्वारी, गहू, द्राक्षे, आंबा पिकांवर होणार असून रोग, किडीचा होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. 

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर ज्वारी कणसाच्या अवस्थेत आहे. खरिपातील कापूस, तूर पिकांची काढणी सुरू आहे. फळबागामध्ये द्राक्षे, डाळिंब, अंजीर ही फळपिके काढणी अवस्थेत आहेत. आंबा फळपीक मोहोराच्या अवस्थेत आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. दिवसभर ढगाळ असले, तरी दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहे. 

विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत गेल्या पाच दिवसांपासून वातावरण बनलेले आहे. एक दिवस वातावरण सुधारल्यानंतर आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरण बसले आहे. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू असून, पावसाळी वातावरण बाधक ठरत आहे. गुरुवारी संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले होते. मराठवाड्यात वातावरणातील बदल पुन्हा एकदा रब्बी पिकांच्या मानगुटीवर बसण्याची चिन्हे आहेत. गत दोन ते तीन दिवसांपासून औरंगाबाद, जालना, बीड, उस्नानाबाद, लातूर या पाच जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी ढगांची गर्दी पाहायला मिळाली. गुरुवारी दुपारपर्यंत अनेक ठिकाणी ऊन सावलीचा खेळ अनुभावयला मिळाला. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत एक दोन ठिकाणी बुधवारी रात्री तुरळक पाऊस झाला. ढगाळ वातावरण व अधूनमधून तुटणारे पावसाचे थेंब शेतकऱ्यांची चिंता वाढवित आहेत. तुरीची मळणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पूर्व तालुक्यांच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतकरी संतोष कांडेकर यांच्या द्राक्ष बागामधून पाणी वाहू लागले होते. याचा परिणाम द्राक्षे बागावर होणार असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातही दुपारी तुटक तुटक स्वरूपाचे थेंब पडले.  कोल्हापूर, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामाचे नियोजन कोलमडले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गुऱ्हाळघरांना बसला असून, त्यांची धुराडी थंडावली आहेत. साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने होत नाहीत तोच अवकाळी बरसल्याने ऊसतोडणीही मंदावल्या आहेत. दिवाळीनंतर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांनी गती घेतली होती. मात्र अवकाळीमुळे झटका बसला आहे. 

पावसामुळे वाफसा येत नसल्याने ऊसतोडणीही अडखळत सुरू आहे. ऊस भरलेली वाहने शेतात अडकण्याचा धोका असल्याने सखल भागातील ऊसतोडणी रखडली आहे. दिवसभर ढगाळ हवामान व सायंकाळी पावसाची शक्यता ऊसतोडणीला व्यत्यय निर्माण करीत आहे. कोकणातही तुरळक ठिकाणी अधूमधून सरी पडत आहे. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.  पावसाचा फटका 

  • गहू, हरभऱ्याचे अनेक ठिकाणी नुकसान 
  • काही ठिकाणी ज्वारी पीक झाले आडवे 
  • द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास प्रारंभ 
  • डाळिंब आणि अंजीर फळगळ शक्य 
  • काढणीसाठी आलेल्या तूर पिकाला मोठा फटका 
  • हापूस आंब्याच्या मोहोरावर परिणाम 
  • भाजीपाला पिकांचेही नुकसान 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com