पालम, परभणी तालुक्यातील साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे पुरामुळे नुकसान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : पालम आणि परभणी तालुक्यांत रविवारी (ता. १) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला. यामुळे ३१ गावांतील शेतकऱ्यांच्या सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथामिक अंदाज आहे. या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसानभरपाईसाठी १८९३ अर्ज विमा कंपनीकडे सादर केले आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे संयुक्त पंचनामे केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

रविवारी (ता. १) रात्री पालम तसेच परभणी तालुक्यातील झरी मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. पालम तालुक्यातील लेंडी, गळाटी या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी पेंडू खुर्द, पेंडू बुद्रुक, सेलू, कोळवाडी, उमरा, वरखेड, खोरस, तांदूळगाव, पेठ पिंपळगाव, धुप्पा, सरफारजपूर, जवळा, पालम, पुयनी, कापशी, बनवस, सिरपूर, आरखेड, घोडा, सोमेश्‍वर, चाटोरी, नाव्हा, नाव्हलगाव, कंदलगाव, कोनेरवाडी, बोरगाव बु., बोरगाव खुर्द, सायाळा २९ गावांतील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्याने सोयाबीन, तूर, कापूस आदी पिके पाण्याखाली गेली.

पुराच्या पाण्यामुळे जमीन खरडून गेल्यामुळे सुपीक मातीचा थर वाहून गेला. गाळ येऊन बसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. झरी, वाडी दमयी (ता. परभणी) येथील ओढ्यानाल्याचे पाणी शेतांमध्ये गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत विमा कंपनीला नुकसानीची माहिती दिल्यानंतर नुकसानभरपाई देण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाते.

पालम तालुक्यातील २९ गावांतील पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत १८७३ अर्ज विमा कंपनीकडे आॅफलाइन पद्धतीने भरून दिले आहेत. कृषी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी संबंधित शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतांवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. झरी आणि वाडी दमयी येथील २० शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केले आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com