`असा दुष्काळ कधी पाहिलाच नाही’

माझ्या सत्तर वर्षांच्या काळात अशी परिस्थिती पाहिली नाही. यंदा आगुट (पीक हंगाम) साधली नाही. आताच प्यायला पाणी नाही, पुढं कसं व्हायचं. जनावरं जगली पाहिजेत, नाही तर काही खरं नाही. - जगन्नाथ पवार , शेतकरी, कौडगाव, जि. नगर.
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान
दुष्काळामुळे पिकांचे नुकसान

नगर ः ‘‘मी  आतापोस्तर बऱ्याच बाऱ्या दुष्काळ पाहिला. अगदी १९७२ चा दुष्काळही अनुभवला. पण असा दुष्काळ कधी पायला नाही. मी तं म्हणतो, शंभर वर्षांत असा दुष्काळ पडला नसंन, माणसं कसंही जगतील ओ, मुक्‍या जिवाचं कसं व्हायचं याची प्रत्येकालाच काळजी लागलीय. अजून आठ महिने जायचेत, पुढं तरी पाऊस पडल हे कोणाला सांगता येतंय.’’ नगर तालुक्‍यातील पांगरमलचे विक्रम आव्हाड, मारुती आव्हाड दुष्काळाची तीव्रता आणि आतापर्यंतचे अनुभव सांगत होते. त्यांच्या बोलण्यातून दुष्काळाची तीव्रता अधिकच गंभीर असल्याचे जाणवत होते. पाथर्डी, नगर, शेवगाव या तालुक्‍यांतील अनेक गावांतील लोकांनी दुष्काळामुळे असलेली हतबलता मांडली.

ज्वारी करपू लागलीय नगर जिल्ह्याने गेल्या दहा वर्षांत सुमारे पाच ते सहा वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्या आहेत. मागची दोन वर्षे जरा बरी गेली, पण यंदा गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झालीय. पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरीप वाया गेला. खरिपाची ४ लाख ८३ हजार ७४० हेक्‍टरवर पेरणी झाली होती. एक लाख २ हजार हेक्‍टरवर कापूस लागवड होती. बाजारीचे क्षेत्र मात्र घटलेले होते. त्यातही पावसाअभावी उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा आर्थिक फटका बसला. पण रब्बीची तर पेरणीच झाली नाही. रब्बीचे सहा लाख ६७ हजार २६० हेक्‍टर क्षेत्र असताना ६३ हजार २३७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यातही ज्या भागात ज्वारीची पेरणी झाली तेथे परतीचा पाऊस नसल्याने दोन फुटांवर आलेली ज्वारी आता जागेवरच करपू लागली आहे.

जिल्ह्यामध्ये सगळ्याच तालुक्‍यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सर्वाधिक फटका नगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत या तालुक्‍यांना बसला आहे. ‘‘पाऊस नाही, पिके हातची गेली, जगायची चिंता लागलीय, जनावरे कशी जगतील. त्यामुळे सरकारने काही तरी केलं पाहिजे. यंदा असं कसं झालं तेच कळत नाही, पोळ्यापासून पावसाचा ठिपूसही आला नाही,’’ नगर तालुक्‍यातील पिंपळगाव माळवी येथील काशीबाई शिंदे सांगत होत्या. कौडगावच्या शिवारात जनावरे सांभाळणारे वयस्क प्रभाकर सानप यांनीही दुष्काळाबाबत बोलताना हतबलता व्यक्त केली. ‘‘पोळ्यापासून पाऊस नाही, असं कधी झालं नव्हतं. यंदा असं कसं झालं तेच कळत नाही.’’

पांगरमल येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी विष्णू आव्हाड यांच्या वाया गेलेल्या कांद्याची पाहणी केली. येथील विक्रम आव्हाड, मारुती आव्हाड म्हणाले, ‘‘आजच एवढी अवघड परिस्थिती झालीय, प्यायला पाणी नाही, पिके वाया गेली, चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. जनावरे जगवण्याची चिंता लागलीय. काही लोकांनी जवळच्या घोडेगावच्या बाजारात कवडीमोल दराने जनावरे विकायला सुरवात केलीय. अजून आठ महिने जायचेत. पुढं तरी पाऊस पडलंच याचा काय भरोसा. १९७२ ला पडलेला दुष्काळ यापेक्षा बरा होता. खायला नव्हते, पण पाणी मुबलक होते. मी तं म्हणतो शंभर वर्षांत असा दुष्काळ पडला नसंल.’’

सिंचनाची अजिबात शाश्‍वती नसलेल्या पाथर्डी तालुक्‍यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. तिसगावचे फलोत्पादक शेतकरी प्रदीप वाघ म्हणाले, ‘‘पावसाळ्यात पाऊस झाला तरच फळबागा जगतात. अन्यथा, अवघड परिस्थिती होते. यंदा सुरवातीपासूनच पाऊस नाही. त्यामुळे विकतच्या पाण्यावर फळबागा जगवायची धडपड असली तरी किती दिवस विकतचं पाणी घालणार, डोळ्यादेखत वर्षानुवर्षं जगवलेल्या बागा वाया गेल्यावर काय वाटणार?’’

शेवगाव तालुक्‍यातील आंतरवलीचे शेतकरी भीमराव खंडागळे यांनी यंदा अडीच एकरांवर कापूस, मटकी, तूर लावली होती. दर वर्षी मोठ्या प्रमाणात कापूस निघतो. यंदा दोन एकरांवर फक्त वीस किलो कापूस निघाला. ‘‘कापसाच्या झाडा दोड्याच आल्या नाहीत. खर्च सोडा, लावलेल्या बियाण्याचेही पैसे निघाले नाहीत, मजुरी वाया गेली. आता एवढ्यावर काय होणार? पण आता इलाज नाही. प्यायलाच पाणी नाही, शेताच काय घेऊन बसलात.’’ असे सांगताना दुष्काळाबाबत हतबलता व्यक्त केली.

पाथर्डीत महिनाभर पुरेल एवढाच चारा दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाभर प्रशासनाचे अधिकारी, पालकमंत्री आणि स्थानिक नेते तालुकानिहाय टंचाई आढावा बैठका घेत आहे. सिंचनाची कसलीही शाश्‍वती नसलेल्या पाथर्डी तालुक्‍यात दुष्काळी स्थिती अत्यंत गंभीर आहे. गंभीर दुष्काळाच्या यादीत असलेल्या पाथर्डी तालुक्‍यात यंदा ५६.८३ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. खरिपात बाजरीपासून मिळालेले ‘सरमड’ एवढाच चारा उपलब्ध आहे. तालुक्‍याचा विचार करता फक्त महिनाभर पुरेल एवढाच चारा तालुक्‍यात उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तालुक्‍यात सध्या सुमारे सव्वा लाख जनावरे आहे. जिल्ह्यामध्ये ८९ टॅंकरने सध्या पाणीपुरवठा केला जात असला तरी एकट्या पाथर्डी तालुक्‍यात तब्बल ५३ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्च-एप्रिलच्या काळात एकट्या पाथर्डी तालुक्‍यात दीडशेवर टॅंकर पाणीपुरवठ्यासाठी लागतील, असा प्रशासनाचा अंदाज असून आठ कोटी वीस लाखांचा संभाव्य आराखडा तालुक्‍यासाठी केला आहे.

उसाचा चाराही मिळणे अवघड दुष्काळात उसाचा चाऱ्यासाठी बऱ्यापैकी वापर केला जातो हा आतापर्यंतचा अनुभव आहे. दक्षिणेतील तालुक्‍यांत पाऊस नसल्याने ‘हुमणी’चा मोठा प्रादुर्भाव झाला असून, उसाचे पीक वाया गेले आहे. नगर जिल्ह्याच्या उत्तरेतील काही तालुक्‍यांत उसाचे क्षेत्र जास्ती आहे. मात्र तेथेही ‘हुमणी’चा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यांपर्यंत ऊस टिकेल याची शाश्‍वती नाही. त्यामुळे जनावरे जगवण्यासाठी आतापर्यंत मोठा आधार मिळालेल्या ऊसही चाऱ्यासाठी यंदा मिळेल याची शाश्‍वती दिसत नाही.

जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता पाहून तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. मी स्वतः प्रत्येक तालुक्‍यात फिरून माहिती घेत आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, मजुरांना रोजगार या बाबींनी प्राधान्य असेल. दुष्काळ निवारण करताना कामांत कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. दुष्काळ तीव्र असला तरी सर्व बाबींची खबरदारी घेतली जाईल. लोकांनी पाणी, चाऱ्याची काटकसर करावी, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com