गंजेवाडी (जि.
बातम्या
डिझेल दरवाढीने पीक काढणीचे दर वाढले
गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने वाढल्याचा ताण शेतकऱ्यांच्या खिशावर पडू लागला आहे. सध्या गहू, हरभऱ्याची मळणी यंत्राच्या साह्याने केली जात असून यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत खर्चात मोठी वाढ झाली आहे.
अकोलाः गेल्या काही दिवसांत डिझेलचे दर सातत्याने वाढल्याचा ताण शेतकऱ्यांच्या खिशावर पडू लागला आहे. सध्या गहू, हरभऱ्याची मळणी यंत्राच्या साह्याने केली जात असून यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत खर्चात मोठी वाढ झाली आहे. हार्वेस्टरच्या साह्याने होत असलेल्या गव्हाच्या मळणीसाठी एकरी १८०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागत आहे.
बेलखेड येथील दादा टोहरे म्हणाले, की डिझेल दर वाढीमुळे आमच्या भागात ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर वाढले. मागच्या वर्षीच्या ट्रॅक्टर भाड्यात दीड ते दुप्पट दरवाढ केली आहे. वरवट बकाल येथील श्रीकृष्ण ढगे म्हणाले, ‘‘यंदा तुरीच्या खुट्या ट्रॅक्टरने पाडण्यासाठी एकराला सातशे रुपये आकारले जात आहेत. ही परिस्थिती पाहता यापुढील काळात शेतीची कामे शासनाने दर निश्चित ठरवून करून देण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. जशी किमान आधारभूत किंमत ठरविली जाते, तसे दर याचेही असायला हवेत.’’
भोसा येथील नितीन खुरद यांनी सांगितले की, आधी नांगरटी पाचशे रुपये एकर होती. आता सहाशे रुपये द्यावे लागत आहेत. रोटरचा दर सातशेवरून नऊशे झाला आहे. थ्रेशरच्या साह्याने पिकांची काढणी करण्यासाठीचा, मार्केटला शेतमाल नेण्याचाही दर महागला आहे.
सध्या हरभरा काढणी जोरावर आहे. गव्हाचाही हंगाम काही भागात सुरु झाला आहे. पूर्वीसारखे मजूर कुशल मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी यंत्राच्या साह्याने काढणीला पसंती देत आहे. यासाठी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंत्राचे भाडे महागले आहे. हार्वेस्टरचा दर वेगवेगळ्या भागात भिन्नभिन्न आकारला जातो. रस्त्याला लागून असलेल्या शेताला आणि आत मधील शेताला वेगळा दर ठरवतात. एकाच ठिकाणी जास्त क्षेत्र असेल तर त्याचाही दर ठरविताना विचार केला जात आहे. अकोल्यात एक फेब्रुवारीला डिझेल ८१.९८ रुपये दर होता. २८ फेब्रुवारीला हाच दर ८७.१५ रुपये लिटर दर बनला. महिनाभरात सहा रुपये दर वाढला.
खर्च-उत्पन्नाची बरोबरी; स्पर्धेमुळे तोट्याचा धंदा
तर दुसरीकडे ट्रॅक्टरची संख्या अधिक असलेल्या भागात जेमतेम दरात शेतीची कामे करावी लागत आहेत. तपोवन येथील शेतकरी प्रमोद पाटील म्हणाले, आमच्या भागात सध्या ट्रॅक्टरचे भाडे ५५० ते ६०० रुपये तास आहे. एक तासाच्या कामासाठी ट्रॅक्टरला चार लिटर डिझेल लागते. याचे ३४० रुपये होतात. चालकाचा ५० रुपये तास खर्च आहे. १० रुपये प्रतितास इतर खर्च, असा ४०० रुपये तास सरळसरळ खर्च आहे. त्यातही यंत्राची तुटफूट झाल्यास वेगळे पैसे लागतात. एका तासाला दिडशे ते दोनशे रुपये शिल्लक दिसतात. परंतु त्यातही टायर, इंजिन घसाई, बॅचरी खर्च, बँकेचे कर्ज असल्यास व्यास, डिझेल आणण्याचा खर्च, गावापासून शेतापर्यंत ट्रॅक्टर जाण्याचा खर्च गृहीत धरावा लागेल. याची आकडेमोड केल्यास सध्या मिळणारा दर व होणारा खर्च याची बरोबरीच होत आहे.
कामाचे दर वाढले
निंबाजी लखाडे म्हणाले, की नांगरणी आधी हजार रुपये एकर होती. आता १२०० रुपये झाली. वखरणी पंजीसाठी ५०० ऐवजी ६०० रुपये तास घेतला जात आहे. पेरणी ६०० वरून ७०० तर हार्वेस्टर १२०० वरून १५०० रुपये दर आकारत आहे. मळणी यंत्राने हरभरा काढताना १२० रुपयांऐवजी १५० रुपये पोत्याला आकारतात.
- 1 of 1592
- ››