औरंगाबाद, जालना, बीडमध्ये साडेसहाशेवर पीककापणी प्रयोग

औरंगाबाद, जालना, बीडमध्ये साडेसहाशेवर पीक कापणी प्रयोग
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये साडेसहाशेवर पीक कापणी प्रयोग

औरंगाबाद : औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील खरीप पिकांची उत्पादकता काढण्यासाठीचे पीककापणी प्रयोग सुरू आहे. तीनही जिल्ह्यांत उडीद, मूग सोयाबीन आदी पिकांचे जवळपास साडेसहाशेवर प्रयोग घेण्यात आले आहेत. उडीद, मुगाचे प्रयोग जवळपास आटोपल्यात जमा असून, नियोजित पीककापणी प्रयोगापैकी ९० टक्‍के प्रयोग आटोपल्यानंतर संबंधित पिकाची नेमकी उत्पादकता किती ते कळणार आहे.

पावसाच्या प्रदीर्घ खंडाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील खरिपाची पिके जवळपास गेल्यातच जमा आहेत. कोरडवाहू कपाशीची वाढ खुंटली, मूग, उडदाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेतच पाऊस गेला. सर्वाधिक क्षेत्रावर असलेल्या सोयाबीनचीही मूग, उडदासारखीच अवस्था झाली. परतीच्या पावसाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाने आपल्या लहरीपणाचा परिचय देणे सुरू केले आहे. शिवाय काढणीला आलेल्या सोयाबीनचेही हा पाऊस नुकसान करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. जवळपास २९५८ गावांतील खरीप पैसेवारी ५० पैशांच्या आत आली आहे.

५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांमध्येही काठावर पैसेवारी जास्त असलेल्या गावांची संख्या जास्त आहे. प्राप्त माहितीनुसार यंदा औरंगाबाद जालना व बीड या तीन जिल्ह्यांत भात, भुईमूग, मका, मूग, सूर्यफूल, सोयाबीन, उडीद, कापूस जिरायती व बागायती, कार्हाळ, ज्वारी, तीळ, तूर आदी पिकांचे ६१८४ पीककापणी प्रयोग नियोजित करण्यात आले आहेत. त्यापैकी औरंगाबाद जिल्ह्यात उडदाचे नियोजित ७६ पैकी ३०, जालना जिल्ह्यात १३४ पैकी ४२, तर बीड जिल्ह्यात १६० पैकी ३६ पीककापणी प्रयोग घेण्यात आले आहेत.

मुगाचे औरंगाबाद जिल्ह्यात १९६ पैकी १४४, जालना जिल्ह्यात ३८६ पैकी १६८, तर बीड जिल्ह्यात ३२४ पैकी १७२ पीककापणी प्रयोग घेण्यात आले. सोयाबीनची काढणी तूर्त सुरू आहे. सोयाबीनचे औरंगाबाद जिल्ह्यात नियोजित १२८ पैकी ४, जालन्यात १०२ पैकी ४, तर बीड जिल्ह्यात २८८ पैकी १८ पीककापणी प्रयोग घेण्यात आले आहेत.

मकाचे औरंगाबाद जिल्ह्यात नियोजित १०८ पैकी एकही प्रयोग झाला झाला नाही. जालना जिल्ह्यात ४४ पैकी २, बीड जिल्ह्यात नियोजीत ४४ पैकी २ पीक कापणी प्रयोग झाले आहेत. तिळाचे तीनही जिल्ह्यांत नियोजित २०४ पैकी १८, काऱ्हाळाचे ६४ पैकी ६, भुईमुगाचे ३५४ पैकी २ पीककापणी प्रयोग घेण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. या पीककापणी प्रयोगातून प्रत्येक पिकाची नेमकी उत्पादकता किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com