`नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळपीक विम्याची रक्कम देऊ`

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या वर्षी मृग बहर २०१८ मधील डाळिंब, मोसंबी, चिकू या फळपिकासाठी नगर जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे अंतिम मुदतीनंतर सादर केल्याने संबंधित शेतकऱ्यांचा समावेश विमा योजनेमध्ये झाला नव्हता. नगर जिल्ह्यातील सात ते आठ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. अखेर प्रहार संघटनेने पुण्यातील कृषी आयुक्तालयासमोर आंदोलन केल्यानंतर कृषी आयुक्तांनी या प्रकाराची दखल घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी सुमारे ४० कोटी रुपये देऊ, असे आश्वासन कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांनी प्रहार संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांना दिले. 

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यातील फळपीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी कृषी आयुक्तालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ११) आंदोलनास सुरवात केली होती. या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा रुग्णसेवक नयन पुजारी, नितीन पगार, बाळासाहेब गालफाडे, उमेश महाडिक, प्रशांत चव्हाण, नौशाद शेख, प्रकाश वरे, बाळासाहेब कदम, प्रहार वारकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय बारस्कर, प्रहार शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, नगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष विनोद पवार, संजय नाचन, कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते आदी उपस्थित होते.

श्री. पोटे म्हणाले, की प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू करताच कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांनी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना आंदोलन न करण्याची विनंती करून चर्चेसाठी बोलावले. चर्चेमध्ये उदय देशमुख यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाकडे विमा मान्यतेसाठी पाठपुरावा केल्यानंतर ३० मे रोजी मान्यता मिळालेली आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेच्या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरील मान्यतेच्या आधारे राज्य शासनाकडे विमा हप्ता अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. तसेच केंद्र शासनाचा विमा हप्ता अनुदानाचा हिस्सासुद्धा नंतर प्राप्त होईल. त्यानुसार संबंधित विमा कंपनी नुकसानभरपाई शेतकऱ्यांनी अदा करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करेल, असे  सांगितल्याचे श्री. पोटे यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com