पीकविमा जाहीर झाला, पैसै कधी मिळणार? 

नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भरलेला गत वर्षीचा पीकविमा जाहीर झाला खरा, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.
Crop insurance announced, when will you get the money?
Crop insurance announced, when will you get the money?

नगर ः नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भरलेला गत वर्षीचा पीकविमा जाहीर झाला खरा, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. पैसे कधी मिळणार या बाबत नेमकी माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. कृषी विभागाने या बाबत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. मात्र नगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे नेहमीप्रमाणे विमा योजनेकडे दुर्लक्ष असल्याचे सतत दिसून आले आहे.  नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी (२०२०-२१) राष्ट्रीय पीकविमा योजना व पंतप्रधान पीकविमा योजना व फळपिकांसाठी ५ लाख १३ हजार शेतकरी सहभागी झाले. दोन्ही योजनांतून २ लाख ८६ हजार ८११ हेक्टरवर विमा या शेतकऱ्यांनी उतरविला. त्यासाठी ३३ कोटींचा हप्ता भरला. शासनाकडून त्यांच्या हिश्‍शाची मिळालेली रक्कम वेगळीच. मात्र भरपाई केवळ ११ कोटींचीच मिळाली. त्यात खरिपासाठी ८ कोटी ४९ लाख रुपये मिळाल्याचे जाहीर केले. पण नगर जिल्ह्यात खरिपाचा विमा मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले होते.  शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांच्यासह संघाच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत व नगर, पुणे, मुंबईच्या कार्यालयात आंदोलन केल्याने विमा कंपनीने विमा जाहीर केला. मात्र आता त्याला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असला, तरी बहुतांश शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. या बाबत कृषी विभागाकडे शेतकरी विचारणा करतात, मात्र नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे या बाबत काहीच माहिती नाही.  फळबागांसाठी २ कोटी ६९ लाख रुपये मिळाले. विमाभरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अवघी १७ हजार ३६८ रुपये आहे. शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत पंतप्रधान विमा योजना व सरकारद्वारे विमा कंपन्यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना राबविल्या जातात. पंतप्रधान पीकविमा योजना, स्थानिक आपत्ती, काढणीपश्‍चात बाबी, खरीप व रब्बी हंगामातील विमा योजनांद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले जाते. मागील वर्षी २०२०-२१मध्ये या योजनांतून खरिपासाठी ४ लाख ६६ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ४८४ हेक्टरवर विमा उतरवला होता.  डाळिंब, संत्री, पेरू, चिकू, मोसंबी, लिंबूसाठी मृग बहरमध्ये ४१ हजार ७८३ शेतकऱ्यांनी व आंबिया बहरामध्ये ५ हजार १०२ शेतकऱ्यांनी विमा भरला. दोन्ही बहरांतील मिळून २७ हजार ३२७ हेक्टरवर क्षेत्रासाठी १६ कोटी १२ लाख ८४ हजार रुपयांचा हप्ता भरला. यातून फळपिकांसाठी ३२२ कोटी रुपये संरक्षित रक्कम झाली होती. भरपाई मात्र केवळ २ हजार ७६० शेतकऱ्यांना २ कोटी ६९ लाख ६४ हजार रुपये असल्याची जाहीर केली. यातीलही अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. 

प्रतिक्रिया  पीकविमा भरला, जाहीरही झाला. परंतु पैसे मिळत नाहीत. या बाबत मी संबंधित कंपनीच्या कार्यालयाकडे सतत पाठपुरावा करतो आहे. कृषी विभाग, विमा कंपनीकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. संपर्क केला तर संबंधित लोक फोनही उचलत नाहीत.  - बाळासाहेब नवगिरे, शेतकरी, नेवासा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com