पीक विम्यातून मंगळवेढ्यातील तीन मंडळ वगळले 

Crop insurance excludes three circles from Mars
Crop insurance excludes three circles from Mars

मंगळवेढा, जि. सोलापूर ः दुष्काळ आणि अवकाळी पाऊस यामुळे तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. दुष्काळ व अवकाळीच्या नुकसानीची नोंद कृषी व महसूलकडे असताना विमा कंपनीने तीन महसूल मंडळ वगळले आहेत.  

डाळिंबाच्या मृग बहारात गतवर्षी तालुक्यातील मरवडे, बोराळे, आंधळगाव, भोसे, मारापूर, हुलजंती, मंगळवेढा या सात महसूलातील जवळपास आठ हजार शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा भरला. जूनपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत फळपिकांना दुष्काळाने घेरले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने तर काही शेतकऱ्यांनी टॅंकरचा आधार घेऊन फळबागा जतन केल्या. हातातोंडाशी आलेल्या फळबागा ऑक्टोबर महिन्यात पावसाने झोडपून काढल्या. त्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला.

दरम्यान महसूल व कृषी खात्याने नुकसानी जे पंचनामे केले त्यामध्ये विमाधारक शेतकऱ्यांना फळपिकाची भरपाई दिली नाही. विमा कंपनीकडून ही नुकसान भरपाई नाही, अशा दुहेरी संकटात सापडला तर बजाज विमा कंपनीने भरपाई मंजूर करताना हुलजंती व मारापूर मंडलला हेक्टरी २७ हजार तर बोराळे व आंधळगाव मंडलला ११ हजार भरपाई दिली. तर भोसे, मरवडे, मंगळवेढा या मंडळाला भरपाई पासून वगळण्यात आले. 

बोराळे व आंधळगाव मंडळामध्ये हेक्टरी भरपाई ११ हजार दिली. पण त्यासाठी हप्ता मात्र सहा हजाराचा होता. बागेसाठी औषध खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर विमा नेमका कुणासाठी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर गतवर्षी हेक्टरी ५५ हजार, भरपाई दिलेल्या मंगळवेढा, भोसे, मरवडे मंडळाला वगळून विमा कंपनीने सवतीची वागणूक दिल्याचे स्पष्ट होते. कंपनीवर सरकारचा अंकुश असावा.  - चंद्रशेखर कौडुभैरी, शेतकरी, मंगळवेढा 

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करताना कृषी व महसूल खात्यात बरोबर विमा कंपनीचा प्रतिनिधी पाठवणे आवश्यक होते. परंतु शेतकऱ्याच्या पैशांवर गल्लेलठ्ठ झालेल्या कंपनीने उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रताप केला. तालुक्याचे नुकसान झाले असताना तीन मंडलला वगळून दिलेली भरपाई तोकडी असून कंपनीने शेतकऱ्याला फसवण्याचे उद्योग चालू केले. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करणार आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे.  - श्रीमंत केदार, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com