पीकविम्याच्या तक्रारींबाबत गावोगावी शिबिरे घ्या : अशोक चव्हाण

पीकविम्याच्या तक्रारींबाबत गावोगावी शिबिरे घ्या ः अशोक चव्हाण
पीकविम्याच्या तक्रारींबाबत गावोगावी शिबिरे घ्या ः अशोक चव्हाण

मुंबई : पीकविम्याची नुकसानभरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. 

त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, पीकविमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई दिलेली नसल्याचे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुष्काळ व सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांना पीकविम्याच्या भरपाईच्या माध्यमातून भरीव मदतीची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र असतानाही कर्जमाफी मिळालेलीच नसल्याची व्यथा अनेक शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

पीकविमा आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी २२ जुलै २०१९ पासून आंदोलनाला बसले होते. हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसानंतर या आंदोलकांची भेट घेऊन पीकविम्याच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा घेण्याचे, तसेच आठ दिवसांत कर्जमाफी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. कर्जमाफी आणि पीकविम्याची समस्या केवळ एखाद्या गावापुरती मर्यादित नसून, ती राज्यव्यापी समस्या आहे. त्यामुळे राज्य सरकारने हिंगोली जिल्ह्यातील ताकतोडा गावाप्रमाणेच राज्यात तक्रार निवारण शिबिरे आयोजित करावीत. या माध्यमातून प्रशासन व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसमक्ष शेतकऱ्यांना पीकविम्यासंदर्भात आपल्या व्यथा मांडण्याची संधी मिळू शकेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com