पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’

शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जवाटप धोरणाची अवस्था राज्यातील बॅंकांमुळे ‘वराती मागू घोडे’ अशी झाली आहे. खरीप हंगामातील पिके आता कापणीला आलेली असताना पीक कर्जवाटप ७१ टक्क्यांवर आले असून, ते अजूनही सुरूच आहे.
Crop loan distribution slow
Crop loan distribution slow

पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक कर्जवाटप धोरणाची अवस्था राज्यातील बॅंकांमुळे ‘वराती मागू घोडे’ अशी झाली आहे. खरीप हंगामातील पिके आता कापणीला आलेली असताना पीक कर्जवाटप ७१ टक्क्यांवर आले असून, ते अजूनही सुरूच आहे. 

राज्यात २०२१-२२ मधील आर्थिक वर्षात खरीप हंगामासाठी ५० लाख ३९ हजार शेतकऱ्यांना ४० हजार ७९० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटणे अपेक्षित होते. खरिपासाठी मशागतीची कामे मे, जूनपासून सुरू होतात. जुलैत पूर्ण महिना आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाची पेरणी संपुष्टात येते. त्यामुळे ऊस व फळपिके वगळता ऑगस्टअखेर राज्यातील बॅंकांनी इतर सर्व पिकांसाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र बॅंका ऐन हंगामात पीककर्ज वाटपात मागे हटतात. त्यामुळे राज्य शासनाला कधी तंबी देत; तर कधी रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रार करण्याचा धाक देत बॅंकांना दामटावे लागते. 

सहकार विभागाने मात्र कर्जवाटपाची प्रक्रिया योग्य दिशेने चालू असल्याचे नमूद केले आहे. ‘‘सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बॅंकांनी ३५ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना २८ हजार ७६४ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. ही टक्केवारी ७१ टक्क्यांच्या आसपास आहे. आमच्या अंदाजानुसार येत्या महिनाअखेरपर्यंत कर्जवाटप ३५ हजार कोटींच्याही पुढे जाऊ शकेल. 

पुणे विभागात आतापर्यंत सात हजार ६८१ कोटी (उद्दिष्टाच्या ८५ टक्के) तर कोकण विभागात आठ हजार ३०६ कोटी रुपये (७७ टक्के) कर्जापोटी दिले गेले आहेत. नाशिक विभागात पाच हजार ९९१ कोटी (६५ टक्के), औरंगाबाद सहा ५४२ कोटी (५९ टक्के), अमरावती चार ९२५ कोटी (७४ टक्के) तर नागपूर विभागात दोन हजार ७९२ कोटी (७६ टक्के) रुपये वाटप झालेले आहे. बॅंका विविध अडचणींना तोंड देत कर्जवाटपाची प्रक्रिया पार पाडत आहेत. गंभीर स्वरूपाची दिरंगाई होत असल्याचे आम्हाला आढळून आलेले नाही,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

जिल्हा बॅंकांकडून १०० टक्के वाटप खरीप कर्जवाटपात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी सुरुवातीपासून आघाडी घेत उद्दिष्टानुसार १०० टक्के कर्जवाटप केले आहे. जिल्हा बॅंकांनी २३ लाख शेतकऱ्यांना १३ हजार ६४९ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. याउलट राष्ट्रीयीकृत बॅंकांचा कर्जवाटपाचा गाडा अर्ध्यावरच फसलेला आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी आतापर्यंत फक्त आठ लाख ८३ हजार शेतकऱ्यांना ११ हजार ३५५ कोटी रुपये कर्ज दिले आहे. हे वाटप उद्दिष्टाच्या केवळ ५७ टक्के इतके कमी आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com