पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जा

उसासाठी कर्ज हवे आहे. कागदपत्रे गोळा करण्यातच वेळ चालला आहे. पूर्वीचे कर्ज असूनही पुन्हा नव्याने कागदपत्रे मागत आहेत. पुनर्गठनाच्या कर्जाबाबत अद्याप आदेश नाही, असे बँकेतून सांगितले जात आहे. — अमर इंगळे, शेतकरी, उंबरेपागे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
crop loan
crop loan

पुणे ः मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल झाल्याने शेतकरी खरिपाच्या तयारीत व्यस्त असला तरी हातात पैसाच नसल्याने त्याची मोठी कोंडी झाल्याचे चित्र ‘ॲग्रोवन'ने राज्यभरात केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीने तिशीसुध्दा ओलांडलेली नाही. त्यामुळे यंदाच्या खरिपावर संकटाचे ढग अधिक गडद झाले आहेत.    कोरोना लॉकडाउनमुळे पीककर्ज वाटपाला सुरुवात करण्यास बराच विलंब झाला. मे महिन्यात या प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, लॉकडाउनच्या नियमांमुळे बँकांमध्ये पीककर्जासाठी फारसा वेळ दिला गेला नाही. नंतरच्या काळात शेतकरी व लोकप्रतिनिधींचा दबाव वाढत गेल्याने बँकांनी हा विषय गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. पेरणी आठवडाभरावर आलेली असताना हातात पैसाच नसल्याने असंख्य शेतकरी कृषी निविष्ठांची खरेदी करू शकलेले नाहीत. ज्यांनी खते, बियाणे खरेदी केले. त्यांच्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पैशांची अन्य ठिकाणांहून जुळवाजुळव करीत किंवा उधारीवर ते विकत आणले आहे.  अकोला जिल्ह्यात ११४० कोटी, वाशीममध्ये १६०० तर बुलडाणा जिल्ह्यात २४६० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यापैकी एकाही जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक २५ टक्‍क्यांपर्यंत पोचलेला नसल्याची वस्तुस्‍थिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार कोटींचे उद्दिष्ट असताना २८६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरण झाले. यवतमाळ जिल्ह्यात २ हजार १८२ कोटी रुपये उद्दिष्ट असताना ५३४ कोटी ९२ लाख, अमरावती जिल्ह्यात १७२० कोटी उद्दिष्ट असताना १६५ कोटी आणि नागपूर जिल्ह्यात १०३५ कोटी उद्दिष्ट असताना केवळ १२० कोटी रुपयांचे वाटप आजवर झाले आहे.   नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी ३ हजार ४१० कोटी रुपये उद्दिष्ट असून आतापर्यंत ५४३ कोटींचे पीककर्ज वाटप झाले. पुणे जिल्ह्यात दोन हजार ६३ कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी ९२५ कोटी ७७ लाख म्हणजेच ४१ टक्के वाटप करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात १४३८ कोटी ५२ लाख रुपयांचा पतआराखडा असून त्यापैकी २२१ कोटी ५३ लाख वाटप झाले आहे. नाशिक जिल्ह्यात खरिपात ३३०० कोटी रुपये कर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. त्यापैकी केवळ २३७.९४ कोटी रुपयांचे वितरण झाले असून ही टक्केवारी अवघी ७.२० आहे.  दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी कर्जवाटपाचे १२४० कोटी रुपयांचे उद्दीष्ठ होते. यापैकी ८१३ कोटी रुपयांचे म्हणजेच ६६ टक्के वाटप केले आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामात कर्ज वाटपाचे १ हजार ५५८ कोटी उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ४६१ कोटी ९० लाख, म्हणजेच ३० टक्के कर्ज वाटप झाले आहे. सातारा जिल्ह्यात २२७० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दीष्ट होते. यापैकी ६१४ कोटी म्हणजेच २७ टक्के कर्ज वितरण करण्यात आले आहे. मराठवाड्यात अत्यल्प वाटप सतत दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्यातही यंदा पीककर्ज वाटपाची स्थिती चिंताजनक असून औरंगाबाद, जालना, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांत केवळ १० टक्के कर्जवाटप झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९.८५ टक्के, जालना जिल्ह्यात ७ टक्के, लातूर ३२ टक्के, परभणी ८.४३ टक्के, नांदेड २ टक्के, हिंगोली ५ टक्के वाटप झाले आहे.

पीककर्ज वाटपातील अडचणी  

  • कर्जमाफीची रक्कम जमा न झालेल्यांना नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी 
  • कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात जातोय वेळ 
  • गर्दी वाढल्याने स्टॅम्पची वाढीव दराने विक्रीचे प्रकार 
  • तहसील कार्यालयांमधून कागदपत्रे काढताना मध्यस्थांचा त्रास 
  • तलाठी वेळेवर उपलब्ध होत नसल्याचा फटका 
  • बॅंकांना आरबीआयच्या आदेशाची प्रतीक्षा 
  • एकत्र कुटुंब असेल आणि खाती अनेक असतील तर प्रकरणे नाकारतात
  • जुन्या कर्जदारांना नव्या कर्जासाठी पुन्हा नव्याने सर्व कागदपत्रांची मागणी
  • कागदपत्रांसाठी पळापळ सातबारा, नमुना आठ अ, फेरफार, स्टॅम्प पेपर, स्वयंघोषणापत्र बँकांकडून मागितले जात आहे. यासाठी एक हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत आहे. त्यातच काही ठिकाणी स्टॅम्पपेपरची दीडपट दराने विक्री केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

    प्रतिक्रिया खाते नील झालेले नाही, त्यामुळे तुम्हाला नव्याने कर्ज देता येत नाही. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा न झालेल्यांना नव्याने पीककर्ज द्यावे याबाबत आदेश नसल्याचे बँक अधिकारी सांगत आहेत. या अडचणीमुळे अधिकाऱ्यांनी प्रकरणही स्वीकारलेले नाही.  — प्रमोद देशमुख, शेतकरी, उगवा, जि. अकोला 

    पीककर्जासाठी मी कागदपत्रे काढून ठेवलेली आहेत. अद्याप कर्जमाफीनंतर आता पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. बँकेत जाऊन विचारपूस केली असता अजून वरिष्ठ पातळीवरून आदेश आले नसल्याचे उत्तर देण्यात येते.  — भास्कर गीते,  शेतकरी, देवगाव, जि. औरंगाबाद. जिल्हानिहाय पीककर्ज वाटप (कोटींत)

    जिल्हा    उद्दिष्ट  वाटप 
    अकोला    ११४०  २४३ 
    बुलडाणा  २४६०  १७३ 
    वाशीम   १६००  २१९ 
    कोल्हापूर  १२४०   ८१३
    पुणे   २०६३  ९२५
    नगर ३४१०  ५४३
    औरंगाबाद   ११९६ ११७ 
    जालना  १११५   ७७
    परभणी   १५६७     १३२
    नांदेड    २०३१   ४७
    हिंगोली  ११६८ ५९
    चंद्रपूर १००० २८६
    यवतमाळ २१८२  ५३४
    अमरावती   १७२० १६५
    नागपूर   १०३५  १२०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com