बुलडाणा जिल्ह्यात पीक कर्जवाटपाची गती संथ

जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती आहे. अशा वेळी पेरणीसाठी पीक कर्जाशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांपुढे नाही. मात्र बॅंकांनी हंगाम तोंडावर आलेला असताना ५० कोटींचेही वाटप केलेले नाही. बॅंकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी, शेतकऱ्यांना किरकोळ कागदपत्रांसाठी नाहक त्रास देऊ नये, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल. - प्रशांत डिक्कर, जिल्हाध्यक्ष, युवा आघाडी,स्वाभिमानी शेतकरी संघटना
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः जिल्ह्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. त्यातच आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असताना पीक कर्जवाटपाचा गाडा मात्र संथगतीने पुढे सरकत आहे. हंगामासाठी बॅंकांनी केवळ पाच टक्केही पीक कर्जवाटप केले नसल्याची बाब समोर आली आहे. बॅंकांना १७७३ कोटींचे पीक कर्जवाटप उद्दिष्ट असताना मे महिना संपायला आला तरी त्यापैकी केवळ ५० कोटींसुद्धा वितरित झालेले नाहीत.

येत्या खरीप हंगामात जिल्ह्यातील तीन लाखांवर शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले जाणार आहे. यासाठी १७७३ कोटी रुपयांचा कर्ज वितरणाचा लक्ष्यांक बँकांना देण्यात आला आहे. बुलडाणा जिल्हा बॅंकेची स्थिती चांगली नसल्याने हे पीक कर्जवाटप व्यापारी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकामार्फत वितरित करण्यावर भर देण्यात आलेला आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सर्वाधिक १२०४ कोटींचा पीक कर्जवाटपाचा लक्ष्यांक आहे. या बँकांकडून नेहमीप्रमाणे पीक कर्जवाटप धिम्या गतीने केले जात आहे. आजवर १७०२ शेतकऱ्यांना १३ कोटी २५ लाखांपर्यंत पीककर्ज दिले. उद्दिष्टच्या दोन टक्केही वितरण या बॅंकांनी केलेले नाही. जिल्ह्यातील खासगी बँकांच्या शाखांमार्फत २४० कोटी ८८ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७०८ शेतकऱ्यांना ११ कोटी ५० लाख रुपये वितरित केले गेले आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने २८१ कोटींच्या उद्दिष्टच्या तुलनेत तीन कोटी ९३ लाख रुपये पीककर्ज दिले. बँकेला मिळालेल्या उद्दिष्टाच्या अवघा दीड टक्का वितरण झाले. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला ४७ कोटी २५ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून बँकेने २० कोटी ७९ लाख रुपये वितरित केले. आतापर्यंत जिल्ह्यातील चार हजार १८२ शेतकऱ्यांना एकूण ४९ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com