परभणीत २२४४ कोटींचे कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

परभणी पतपुरवठा आराखडा प्रकाशन
परभणी पतपुरवठा आराखडा प्रकाशन
परभणी ः २०१८-१९ या वर्षी १७८३ कोटी ९१ लाख रुपये पीक कर्ज आणि ४६०.०२ कोटी रुपये इतर शेती कर्ज मिळून २२४४ कोटी रुपये शेती कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. 
 
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३३५५ कोटी ६२ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंगळवारी (ता.३) मंजुरी दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण पतपुरवठ्यामध्ये ४६५.६२ कोटी रुपये (१६ टक्के) तर पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टात १०२ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल यांनी माहिती दिली.
 
यंदा पीक कर्जासाठी एकूण १७८३ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये खरिप पीक कर्जासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपये आणि रब्बी पीक कर्जासाठी ३१३ कोटी ३४ लाख रुपये यांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षासाठी पीक कर्जाचे दर निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये साधारणपणे १० टक्के वाढ करण्यात आली आहे.
 
जिल्ह्यात शेतीवर आधारित तसेच शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, रेशीम शेती, फळबाग लागवड, फुलशेती, शेडनेट, पाॅलिहाऊस, शेतीसुधारणा, शेततळे, विहीर, विद्युत पंप आदी बाबींसाठी कर्जाची जास्त मागणी लक्षात घेऊन यंदा ४६०.०२ कोटी रुपये म्हणजे गतवर्षीपेक्षा ४६.१९ कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे.
 
शासनाच्या विविध योजना तसेच बॅंकांच्या कर्ज योजनांतर्गंत उद्योग व्यवसायाकरिता गतवर्षी ६१७.४९ कोटी रुपये तरतूद यंदा ९३३.७१ कोटी रुपये कर्ज वाटपाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी आणि ग्रामीण भागातील गरिब होतकरू, हुशार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान मुद्रा कर्ज, स्टॅन्ड अप इंडिया कर्ज, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ तसेच इतर महामंडळामार्फत वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाचा समावेश आहे. 
 
नवीन उद्योग उभारणीसाठीदेखील भरीव तरतूद आहे. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेसाठी प्रत्येक बॅंकांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंक व्यवस्थापनांमार्फत देण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक, कला-कौशल्य हस्तगत, सुशिक्षित बेरोजगार, नवीन उद्योजक, बचत गट, शेतीवर आधारित कुटीर, लघू उद्योगांचा समावेश आहे.
 
मंगळवारी (ता.३) जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी जिल्हा वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक राम खरटमल, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रीतम जंगम, बॅंकाचे अधिकारी उपस्थित होते.
 
निश्चित करण्यात आलेल्या पीक कर्ज दराप्रमाणेच बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज  वाटप करावे. खरीप पीक कर्जासाठी रविवारनंतर (ता.१५) संबंधित (दत्तक) बॅंकेत शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करावेत. बॅंकांनी शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून कर्ज वाटपास सुरवात करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com