सांगली : खरिपात एक हजार ३३० कोटींवर पीककर्जवाटप

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत प्रगतिपथावर असणारी कामे महिनाअखेरपर्यंत प्राधान्याने पूर्ण करावीत. केलेल्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग होईल, याबाबत दक्षता घ्यावी. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत कोणीही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेऊन आवश्‍यक अनुदानासाठी पाठपुरावा करावा. - डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली
खरिपात एक हजार ३३० कोटींवर पीककर्जवाटप
खरिपात एक हजार ३३० कोटींवर पीककर्जवाटप

सांगली : येत्या खरीप हंगामासाठी पीककर्जाचे उद्दिष्ट एक हजार ३३० कोटी रुपयांचे आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व बॅंकांनी विशेष प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी पीककर्ज मेळावे गावनिहाय, मंडळनिहाय जून महिन्यापासून सुरू करण्यात येतील. यामध्ये शेतकऱ्यांना आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे संबंधित विभागांनी त्वरित उपलब्ध करून द्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. 

जिल्हा खरीप २०१९ हंगाम पूर्वनियोजन बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, प्रकल्प संचालक, आत्माचे बसवराज मास्तोळी, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ६३१ गावांमधून ५६१ हेक्‍टर खरिपाचे ३ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र राहील. बोगस बियाणे, अन्य कारणांमुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊन हंगाम वाया जाऊ नये, यासाठी बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या जिल्ह्यातील सर्व निविष्ठा दुकानांची भरारी पथकांतर्फे तपासणी करावी. तपासणीचा साप्ताहिक अहवाल सादर करावा. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय निर्माण होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी प्रत्येक तालुक्‍यातून मत्स्यशेतीसाठी शेततळ्यांची निवड करावी. प्रत्येक तालुक्‍यातून शेततळ्यांच्या संख्येनुसार उद्दिष्ट निर्धारित करून त्याला चालना द्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी गटशेतीशी जोडले जावेत, यासाठी मिशन मोडवर काम करावे. पूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यादी तयार करावी.'' 

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा आणि प्रधानमंत्री पीकविमा योजनेतील प्रलंबित प्रकरणांबाबत कंपनी स्तरावर पाठपुरावा करावा. पण, त्याचवेळी अपूर्ण राहिलेल्या प्रस्तावांमधील त्रुटींची पूर्तता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पूर्ण करावी. शेतकऱ्यांच्या वारसांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देशही चौधरी यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com