यंदा दिवाळीतच झाली उलंगवाडी...!

बुलडाणा
बुलडाणा

दसरा अाला की शेतशिवारं पिकांनी बहरून जायची, पण गेल्या काही वर्षांत याला दृष्ट लागली. या वर्षी तर दसऱ्यालाच उलंगवाडीसारखी परिस्थिती झाली अाहे. लावलेला खर्चही निघण्याची शक्यता नाही...बोडखा गावातील दिलीप लक्ष्मण सातपुते सांगत होते. त्यांचे शेत संग्रामपूर तालुक्यातील बोडखा शिवारात अाहे. या वर्षी त्यांनी जून महिन्यात साडेतीन एकरात कपाशीची पेरणी केलेली होती. या पिकातून दसऱ्यापर्यंत एक बोंडसुद्धा कापूस अाला नव्हता. कमी पावसामुळे कपाशीची वाढ झाली नाही. या वर्षी पोळा सण झाल्यानंतर पावसाचा एक थेंबही या भागात झालेला नाही. यामुळे अाजवर तग धरून असलेली कपाशीचे उभे पीक सुकलेले बघायला मिळाले. दुपारच्या वेळेत तर या शेतात पायसुद्धा ठेवासा वाटत नाही, असेही दिलीप सांगत होते.  बुलडाणा जिल्ह्यात या हंगामात सरासरीच्या ७० टक्केही पाऊस झालेला नाही. जो पाऊस पडला त्याचे दिवसही खूपच कमी अाहेत. या जिल्ह्यातील १३ महसूल मंडळांत २५ ते ५० टक्के पाऊस झाला. ५० मंडळांत ५०ते ७५ टक्के पावसाची सरासरी अाहे. २९ मंडळांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस, तर केवळ दोन मंडळांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. जो पाऊस झाला त्यातही खंड इतका मोठा होता की, त्याचा थेट पिकांच्या वाढीवर थेट परिणाम झाला. जून महिन्यातील पावसात २२ दिवसांचा, जुलैत १८, अाॅगस्टमध्ये २३ अाणि सप्टेंबर महिन्यात २८ दिवसांचा दोन पावसांमध्ये खंड होता. या चार मोठ्या खंडांच्या कालखंडाने संपूर्ण खरीप हंगामाचे वाटोळे केले अाहे. गेल्या अाठवड्यात (१५ अाॅक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलडाणा दौऱ्यावर अाले असताना त्यांनी ही खंडाची माहिती दिली. जिल्ह्यातील परिस्थिती भीषण असल्याचे त्यांनीसुद्धा मान्य केले. मागील काही वर्षांत सलगपणे बुलडाणा जिल्हा दुष्काळाच्या छायेत अाहे.  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील कवठळ मंडळात दिलीप सातपुते यांचे बोडखा गाव मोडते. हे गाव खारपाण पट्‍टयात असून, सिंचनाच्या कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. पावसाच्या पाण्यावरच या भागातील शेतीचे भवितव्य अवलंबून असते. सातपुते हे कापूस, सोयाबीन, तूर ही पिके घेतात. या वर्षी या भागात जून महिन्यात पावसाने दणक्यात सुरवात केल्याने त्यांनी पेरणी केली होती. पीकही चांगले उगवले होते. मात्र नंतरच्या काळात पुरेशा पावसाअभावी पिकाची दैनावस्था झाली. कमी पावसामुळे ही दुर्दैवी परिस्थिती उदभवली.  याच गावाच्या भिलखेड शिवारात सोयाबीन, तूर या पिकांची अवस्थासुद्धा अशीच बिकट झाली अाहे. अनेकांनी सोयाबीनची सोंगणी न करता पीक उभेच ठेवले तरी फायदा होईल, असे चित्र अाहे.

कापसाचे माहेरघरही पोखरले बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या तालुक्यातही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. नांदुरा हा तालुका कापूस उत्पादनात सातत्याने अग्रेसर समजला जातो. मात्र येथेसुद्धा या हंगामात घरघर लागली. ‘मी या वर्षी सहा एकरात कपाशीची लागवड केली अाहे. सहा एकरासाठी एकरी दहा हजारप्रमाणे ६० हजार रुपये खर्च लागला. अातापर्यंत ५० किलोही कापूस अाला नाही. लावलेला खर्च कसा निघेल, हीच चिंता बनली अाहे...महाळुंगी येथील राजेंद्र डिवरे अापबिती सांगत होते. राजेंद्र यांच्यासारखीच स्थिती या भागातील असंख्य शेतांमध्ये बघायला मिळाली. कपाशीच्या झाडांवर जेवढी बोंडे लागली ती फुटत अाहे. अवघा महिनाभरात हा कापूस हंगाम संपण्याची चिन्हे तयार झाली. दरवर्षी या भागात अनेकजण किमान दहा ते १५ क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन सर्रास काढतात. अनेकांना कापूस ठेवायला घरात जागा शिल्लक राहत नाही. मात्र यंदाचे वर्ष घराच्या कोपऱ्यातच कापूस बसेल इतके उत्पादन घटलेले अाहे. नांदुरा ते खामगाव या महामार्गालगतच्या शेतांमध्ये कुठेही पिकांची स्थिती चांगली असल्याचे पाहायला मिळत नाही.   

जेमतेम राहले मूग, उडीद,  सोयाबीनचे उत्पादन खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन या तिनही पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांच्या अात अाहे. मूग-उडदाचे एकरी एक ते दीड क्विंटल उत्पादन झाले. सोयाबीन दोन ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन होत अाहे. कपाशीच्या पिकाची अंतिम उत्पादकता अशीच घसरण्याची शक्यता अाहे. विशेषतः कोरडवाहू कपाशीचे पीक संपूर्णतः नुकसानकारक ठरले अाहे.     

विहिरींनी गाठला तळ बोडखा शिवारातील सुनील ठाकरे यांच्या शेतात असलेल्या विहिरीतून मोजून एक तासही पुरेशे पाणी येत नाही. या वर्षी शेतालगत जलयुक्तचे काम झाल्याने पडलेले पाणी जिरले. मात्र एवढे होऊनही अाता दिवाळीपूर्वीच विहिरीतून पाणी गायब झाले. किमान पाच-सहा तास चालणारा कृषिपंप तासाभरातच बंद करावा लागतो. अागामी काळात कितीवेळ हा पंप चालेल असा प्रश्न सुनीलनेच व्यक्त केला.     

जनावरे जगविण्याची कसरत दरवर्षी सोयाबीनची वाढ होऊन त्याचे कुटार मिळते. या वेळी सोयाबीन एक फूट-दीड फुटापेक्षा वाढले नाही. यामुळे त्यापासून मिळणारे कुटारसुद्धा तयार झाले नाही. जिल्ह्याच्या एकूण खरीप क्षेत्रापैकी चार लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. बरेच शेतकरी रब्बीत हरभऱ्याची लागवड करून चाऱ्यासाठी कुटार मिळवतात. पाऊस न झाल्याने प्रकल्प कोरडे राहले. परिणामी भूजल पातळीही घटली. याचा परिणाम अाता रब्बी लागवडीवर होत अाहे. हरभरा लागवड पुरेशी होण्याची शक्यता नाही. यामुळे हरभऱ्याचे कुटार मिळण्याचा स्राेत शिल्लक नाही. परिणामी अाज असलेली जनावरे पुढील महिन्यात विकायची व हंगामाच्या सुरवातीला नवीन विकत घ्यायची, असा बेत शेतकरी करू लागले. 

बियाण्याला उठाव नाही दुष्काळी परिस्थितीत रब्बी पेरणी धरावी की नाही, असा पेच शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला अाहे. परिस्थिती लक्षात घेता शेतकरी रब्बी लागवडीसाठी लागणारे बियाणे खरेदी करायलासुद्धा पाहिजे तितके अाले नसल्याचे या भागातील कृषी केंद्र चालकांनी चर्चेदरम्यान सांगितले. जे शेतकरी पेरणी करीत अाहेत ते घरचेच बियाणे वापरण्यास पसंती देत अाहेत. यामुळे कंपन्यांचे बियाणे, खते पडून अाहेत. पावसाचा पत्ता नाही; पैसेवारी फुगलेली कमी पावसामुळे संपूर्ण बुलडाणा जिल्हा संकटात सापडलेला अाहे. गेल्याच महिन्यात प्रशासनाने नजरअंदाज पैसेवारी जाहीर केली. यात सरासरी ६१ पैसेवारी दाखवण्यात अाली अाहे. काही तालुक्यांची पैसेवारी ७० पैशांपर्यंत, तर काहींची ५५ पैशांपर्यंत पैसेवारी काढण्यात अाली होती. या पैसेवारीच्या अाकड्यांनी शेतकऱ्यांचे डोळे विस्फारले अाहेत. विरोधकांनी हा मुद्दा अाता उचलून धरत वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारी काढण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविली अाहे. दुष्काळाच्या नवीन नियमांनुसार ट्रिगर वननंतर अाता ट्रिगर टू लागू झाला. जिल्ह्यातील बहुतांश भाग यात समाविष्ट झाला अाहे. म्हणजेच दुष्काळ असल्याचे प्रशासकीय अाकडेवारीने शिक्कामोर्तब केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com