राज्यात खरीप अडचणीत

पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिके धोक्यात आल्याबाबत राज्याच्या कोणत्याही भागातून माहिती आलेली नाही. खरिपाच्या पेरण्या राज्यभर आटोपल्या आहेत. काही भागांमध्ये पावसाचा ताण असला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. पावसाचे दिवस अजून संपलेले नाहीत. - विजय घावटे, कृषी विस्तार संचालक, कृषी आयुक्तालय
जालना : पावसाअभावी वखारी येथील रमेश काळे यांच्या शेतातील सुकलेले चाललेले भुईमूग व तुरीचे पीक.
जालना : पावसाअभावी वखारी येथील रमेश काळे यांच्या शेतातील सुकलेले चाललेले भुईमूग व तुरीचे पीक.

पुणे  : राज्यात खरिपाच्या पेरण्या जवळपास आटोपल्या असून, अनेक भागांत पावसाअभावी पिके धोक्यात आलेली आहेत. बीड, औरंगाबाद, सोलापूर आणि नंदुरबार भागांत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. नगर जिल्ह्याच्या काही भागांत तर पिके सुकू लागली आहेत.  राज्यात एक जून ते २७ जुलैपर्यंत फक्त १७ जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जादा पाऊस झाला आहे. यात गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशीम, अकोला या विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यात हिंगोली, नांदेडला तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांत चांगला पाऊस झालेला आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नगर, कोल्हापूर, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलदाणा, अमरावती, भंडारा आणि चंद्रपूरला ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. राज्याच्या ९ तालुक्यांमध्ये ५० टक्केदेखील पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील पिके धोक्यात आहेत.  धुळे जिल्ह्यातील माळमाथा परिसरात शेतकऱ्यांनी मका, कापूस, ज्वारी, बाजरीची पेरणी आटोपली आहे; मात्र पाण्याचा ताण बसत असल्यामुळे पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. बळसाणे भागात गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्याने उभ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. नगरच्या अनेक भागांमध्ये पिके सुकू लागली आहेत. श्रीरामपूर पट्ट्यातदेखील कमी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी यंदा उधार उसनावारी करून खरिपाची तयारी केलेली आहे. त्यात पुन्हा पाऊस नसल्यामुळे काही भागांत दुबार पेरण्यांचे संकट असल्याचे सांगितले जाते.  उत्तर महाराष्ट्रातील १४ तालुक्यांत समाधानकारक पाऊस झालेला नाही. खानदेशात बागायती कापूस फूल पाते लागण्याच्या स्थितीत, तर जिरारायती भागात वाढीच्या अवस्थेत कपाशी आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात बहुतेक पेरा आटोपला आहे. मात्र, औरंगाबाद आणि बीडच्या काही तालुक्यांमध्ये पाऊस नसल्यामुळे पिके कोमजून जात आहेत. चालू आठवड्यात पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या काही भागांत कराव्या लागतील, असे सांगितले जाते.  पश्चिम महाराष्ट्रात माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यांतील पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत. या गोंधळात भर म्हणजे काही भागांत कीड-रोगांनीदेखील डोके वर काढले आहे. काही ठिकाणी ज्वारीला खोडकिडा, सोयाबीनवर अळी दिसून येत आहे. राज्याच्या काही ऊस उत्पादक पट्ट्यांमध्येदेखील पावसाचा ताण बसला आहे. दमदार पावसाअभावी उसाची वाढ खुंटल्यामुळे गेल्या हंगामाइतकी उत्पादकता चालू हंगामात मिळण्याची आशा सध्या तरी दिसत नसल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  दरम्यान, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, पावसाअभावी पिके धोक्यात आल्याचे अहवाल अजून कुठून झालेले नाही. नंदुरबार भागात पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे पेरण्यांना उशीर झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस कमी असला, तरी मुळात हा भाग रब्बी हंगामाचा आहे. विदर्भात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. तीन-चार जिल्ह्यांत पाऊस कमी असून, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.  आपत्कालीन परिस्थितीतील नियोजन  सध्याच्या काळातील पावसाचा पडलेला खंड लक्षात घेता भात, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग या पिकांच्या लागवडीचा कालावधी संपलेला आहे. येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यावर १५ आॅगस्टपर्यंत बाजरी, कारळा, तीळ, सूर्यफूल, एरंडी, धने या पिकांची लागवड करू शकतो. याचबरोबरीने तूर (३ ओळी) आणि बाजरी (३ ओळी) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे शक्य आहे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. भगवान आसेवार यांनी दिला आहे. प्रतिक्रिया बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात पेरण्यांपुरता पाऊस झाल्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने आम्ही काळजीत आहोत. अजून १०-१२ दिवस पाऊस न आल्यास फुलोऱ्याच्या अवस्थेतून जाणाऱ्या सर्व पिकांच्या उत्पादनात घट होईल. उसालादेखील यंदा कमी टनेज मिळण्याची शक्यता आहे. - रवींद्र भानुदास देवरवाडे, प्रयोगशील शेतकरी, मु. पो. देवळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com