झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी उभी

मोसंबीची तीनशे झाडं. दीड महिन्यापासून पाणी नाही. खेर्डा प्रकल्प उशाला पणं त्याला पाणीचं नाही. त्यामुळं मोसंबीचं डोळ्यादेखत नुकसान व्हतयं. दीड एकर ऊस गेला, खायासाठी थोडी बाजरी टाकली ती पणं गेली. ते पाहण्याबिगर हाती काही नाही. - दादासाहेब पांगरे, खेर्डा ता. पैठण, जि. औरंगाबाद.
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी उभी
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने... केवळ बुजगावणी उभी

झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज व्हती तवा आला नाही. खरिपाची मुख्य पिकं हातची गेलीचं म्हणायचं. आभाळं त असं येतयां की किती पडतो अन्‌ किती नाही असं, पणं नुसती भुरभुर अन्‌ संपत. कुठं उन्हाळा न संपल्यागत स्थिती तर कुठं करपलेली पिकं. त्यामुळे शेतशिवारात बुजगावण्याशिवाय कुणीचं नाही, अशी हतबल प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वैजापूर तालुक्‍यातील बळेगाव, जिरी, बिरोळा, वळण, कविटखेडा, नायगव्हाण, मनोली आदी गावशिवाराची ही भयावह स्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील यंदाच्या खरिपाचे भविष्य वर्तविण्यास पुरेशी आहे.  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था पावसाअभावी बिकट झाली आहे. जूनमध्ये बारा दिवस आणि जुलैमध्ये दोन टप्प्यात तेरा दिवसांच्या खंडानंतर आता ऑगस्टचा पहिल्या अकरा दिवसांत पावसाचा चारदोन ठिकाणी झालेली भुरभुर वगळता पावसाची हजेरी नाही. त्यामुळे वाढ खुंटलेल्या पिकांनी जमीनच सोडली नाही. शिवाय ढगाळ वातावरणाने कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने खर्चातही वाढ झाली. सिल्लोड, पैठण, वैजापूर गंगापूर आदी तालुक्‍यांत काही ठिकाणी उन्हाळा मोडलाच नाही.  औरंगाबाद जिल्ह्यातील खरिपाची स्थिती... (video : Santosh Munde)

वैजापूर तालुक्‍यातील बळेगाव, जिरी, बिरोळा, वळण, कविटखेडा, नायगव्हाण, मनोली आदी गावात तर उन्हाळा मोडलाच नसल्याची स्थिती आहे. वैजापूर तालुक्‍यातील २४ गावांतील बाजरी, मका, मूग, तूर, भुईमूग, उडीद, कपाशी आदी पिकांचे ५९८१ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसल्याचा प्रशासकीय अहवाल असला तरी प्रत्यक्षात स्थिती अत्यंत भयावह आहे. फुलंब्री तालुक्‍यातील पिरबावडा मंडळात पावसाअभावी पीक सुकत आहेत. पैठण तालुक्‍यातील लोहगाव, बालानगर, बिडकीन, ढोरकीन मंडळातील काही गावात पुरेसा पाऊस न झाल्याने पूर्ण पेरणीच झाली नाही. गंगापूर तालुक्‍यातील भेंडाळा व मांजरी मंडळात पिकांची स्थिती बिकट आहे. भेंडाळा मंडळातील बाबरगाव, खैरगव्हाण, कोंडापूर, सैदापूर, पखोरा, आगरवडगाव, गणेशवाडी आदी गावांमध्ये सर्वसाधारण खरीप क्षेत्राच्या तुलनेत ५० टक्‍केही पेरणी झाली नाही. चारदोन दिवसांत पाऊस न आल्यास गंगापूर तालुक्‍यातील जवळपास तेरा हजार हेक्‍टरवरील पिकांना मोठा फटका बसू शकतो. सिल्लोड तालुक्‍यातील निल्लोड व बोरगाव बाजार मंडळात तर सरासरीच्या केवळ १७ टक्‍के पाऊस झाला. त्यामुळे तेथील खरीप पिकं संपल्यातच जमा आहे. ३३ मंडळात ५० टक्‍केपेक्षा कमी पाऊस औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ महसूल मंडळांपैकी ६४ मंडळात आजपर्यंत अपेक्षित पाऊस नाही. दुसरीकडे यामध्ये अपेक्षेच्या ५० टक्‍केही पऊस न पडणाऱ्या ३३ मंडळांचा समावेश आहे. औरंगाबाद तालुक्‍यातील लाडसावंगी मंडळाचा अपवाद वगळता एकाही मंडळात अपेक्षीत पाऊस नाही. पावसाचे टक्‍के दिसत असले तरी खंड आणि अत्यल्प प्रमाणात पडणाऱ्या या पावसामुळे जमिनीतील ओल टिकूण राहणे अवघड बनले असून त्याचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर झाला आहे. जलसंधारणाची कामे, नद्या तहानलेलीच जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी वगळता धनाडी, नारंगी, कोल, शिवना, खाम, येळगंगा, गल्हाटी, धोंदा, येळभद्रा, शिवभद्रा, दुधना, मुसा, कळंबी, बोर, ढेकू,खारी, गण, लेंडी, नागीहरी, कौम, वानकी, पूर्णा, चरणा, खेळणा, जुई, धमना, मदनी, अंजन, गिरजा, बनगंगा, फुलमस्त, जीवरका, कुंडलिका, कल्याण, लहूकी, सुखना, चित्ते, बेंबळा, गदागड, हिवरा, सोनद, वाघुर आदी नद्या व उपनद्या. परंतू यंदा गत दिड पावनेदोन महिण्याच्या कालावधीत या नद्यांना पूर आल्याचं ऐकीवात नाही. शिवाय मोठ्या प्रमाणात झालेली जलसंधारणाची कामही तहानलेलीच असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.. (video : Santosh Munde)

प्रतिक्रिया पाऊसच नसल्याने बिरोळासह सहा ते सात गावातील खरीप संपला. ढगं येतात पणं पाऊस नाही, दुबार पेरणीचीही संधी गेली. पिण्याचे पाणी वीज चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. - संतोष गायके पाटील, बिरोळा, संचालक, बाजार समिती वैजापूर. तालुक्‍यापासून सारे पाहणी करून गेले, आमचे प्रश्न सोडण्याच्या दिशेने कोणतीही पावले उचलली नाही. पाहणी पाहणी कुठवरं करणारं, पंचनामे का करतं नाहीत. - किशोर जाधव, शेतकरी, कविटखेडा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. पंधरा वीस वर्षांपूर्वी सर्वेक्षण झालेला वळण येथील प्रकल्प झाला असता तर यंदा उद्‌भवलेली स्थिती निर्माण झालीच नसती. शासनानं पाण्याच्या शाश्वत सुविधेकडे लक्ष द्यायला हवं. - पांडूरंग सूर्यवंशी, बळेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. पिण्यासाठी ढोराला पाणी नाही. पिकं कोमेजून गेली, पाहणी भरपूर झाली पणं प्रतिसाद नाही. चाराछावणी, मजुराच्या हाताला काम अन्‌ पाण्याचं टॅंकर सुरू व्हायला हवं. - राधाकिसन सोनवणे, नायगव्हाण, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. महिना झाला पाऊस नाही. आलां बी तं नुसती भुरभुर. ढगाळ वातावरणामुळं पिक हिरवी दिसतात. थोडबहूत पाणी हाये ते मोसंबीसाठी वापरतो पण पऊस नाही आला त अवघड होईल. - शिवनाथ बापूजी गोर्डे, बालानगर, ता. पैठण, जि. औरंगाबाद. व्हतं नव्हतं ते शेतीत घालून दिलं. व्याजाचा पैसा चालू आहे. धड छावण्या खोलेना अन् काहीच नाही. पिण्याला पाणी पुरतं मिळतं नाही. शेतकरीच मरत असलं तर मग सरकारच करायचं काय. - माधव दिवेकर, बळेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com