धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू देईना

सात एकर कापूस लागवड केली. महिना- दीड महिना झाला पाऊस नाही. आता पाऊस आला तर ठिक नाही तर दुष्काळ आहेच. येथून पुढे पाऊस आला तर कसबी निम्म सिम्म हाती लागलं. नाही तर खर्चाला महाग. - ज्ञानोबा काळे, डाकू पिंपरी, ता. पाथरी
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू देईना
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू देईना

झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर नाही. काळझंर आभाळ भरून येतयं; पण नुसता झिमझिम पाऊस पडतोय. जमिनीचं पोट भरलं नाही. ओढ्या नाल्याला पाणी वाहिलं नाही. रानात पेरणीच्या वेळी होती तशीच खरखर अजून कायम आहे. जमीन भेगाळली असून उभी पिके होरपळून गेलीत. अजून उन्हाळा मोडलाच नाही, अस वाटत. धन (पीक) जोप्या पाऊस येत आहे मरू देईना अन वाचू देईना, अशा शब्दांतपाथरी तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या गंगथडीसह इतर गावांतील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. गोदावरी नदी काठच्या पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यांतील अनेक गावांत पावसाच्या दीर्घ खंडामुळे कोरड्या दुष्काळ सावट गडद होत चालले आहे. हलक्या, बरड जमिनीवरील सोयाबीन, मूग, ज्वारी, बाजरी आदी कमी कालावधीत येणारी खरीप पिके होरपळून गेली आहेत. काळ्या कसदार जमिनीवरील पिके हिरवी दिसत आहेत. पाण्याअभावी वाढ खुंटल्यामुळे ती अजून भुईनेच रागंत आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदादेखील पाथरी, बाभळगांव, हदगांव मंडळांमध्ये तालुक्यात जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. त्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता आली नाही. जुलै महिन्यात रिमझिम पाऊस झाल्यानंतर पेरणी उरकली. माळीवाडा, पुरा, तुरा, गुंज, गौंडगाव, अंधापुरी, बाबुलतार, टाकळगव्हाण, आनंदनगर, सुरताबाई तांडा, लोणी बु, बाभळगांव, कानसूर, तारुगव्हाण, डाकू पिंपरी, लिंबा, विटा, मुद्दगल आदी गावशिवारात तब्बल 22 ते 25 दिवसांपासून पावसाने दडी मारली. मानवत तालुक्यातील रुढी, खरबा, मानवत, रत्नापूर आदी गावांतील वाढीच्या परिपक्वतेच्या अवस्थेतील मूग, सोयाबीन, उडिद, ज्वारी, बाजरी आदी पिकांना माना टाकल्या. सोनपेठ तालुक्यातील गवळी पिंपरी, नखातवाडी, चुकार पिंपरी, आवलगांव, वंदन, वडगांव स्टेशन आदी गावशिवारातील सोयाबीन, ज्वारी, पिके पावसाअभावी वाळून गेली. कपाशीच्या पिकांमध्ये भेगा पडल्या आहेत. गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा, सुरवाडी, दगडवाडी, पडेगांव शिवारातील सोयाबीन सुकून गेले. रुढी (ता. मानवत) येथील विष्णू निर्वळ म्हणाले, की महिनाभरापासून पाऊस गायब झालेला आहे. बोंड अळीमुळे कापूस गेला. सोयाबीन, मूग, उडिदला ताण बसला. आता पाऊस आला तरी उताऱ्यात मोठी घट येणार आहे. संत्र्याची फळगळ होत आहे. बाबुलतार येथील शेख युनुस म्हणाले, की पावसाअभावी कपाशीच्या लागवडीस उशीर झाला, सध्या पीक बरं दिसतय परंतु पाऊस नसल्याने वाढ होत नाही. टाकळगव्हाण तांडा येथील शंकर चव्हाण म्हणाले, की सात एकर शेती आहे. सोयाबीन, कापूस लागवड केली. पाऊस लई मागून पडला. इतरांनी पाण्यावर लावलेली कपाशी कमरेला लागत आहे. पण आमची मात्र अजून गुडघ्याच्या खालीच आहे. आभाळ येतय म्हणून बर दिसत आहे. पण उन्हात समदी पीक माना टाकतायत. बाभळगाव येथील बाळासाहेब रनेर म्हणाले, की कीड, रोगा पाठोपाठ पावसाने दडी मारल्याने गेल्या वर्षीसारखेच यंदाबी खरीप हंगामातून काहीच हाती लागण्याची चिन्हे दिसत आहेत. लोणी बु येथील सोपानकाका गिराम म्हणाले, यंदा झिम झिम पाऊस पडत आहे. त्यानं जमिनीच पोट भरल नाही. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी पाणी देत आहेत. पण कोरडवाहूवाल्या शेतकऱ्यांच सगळं अवघड झालं आहे. गवत सुकुन जात असल्यामुळं चाऱ्याची भानगड आहे. प्रतिक्रिया तीन जुलै रोजी दहा एकरमध्ये सोयाबीन, मूग, कापूस, तुरीची पेरणी केली. पण त्यानंतर पाऊस आला नाही. दोन एकर सोयाबीन, अर्धा एकर मूग मोडून टाकावा लागला. रिमझिम पाऊस येत आहे. त्यानं अंगावरचे कपडेदेखील भिजेनात. अजून रानातील भळी तशाच आहेत. उभ्या पिकाचं काहीच खरं नाही. मुगाला नुसता हिरवा पाला आहे. शेंगा लागल्या नाहीत.  - बाळासाहेब हरकळ, विटा बुद्रुक, ता. पाथरी

दीड एकर सोयाबीनने फुलोरा धरलाय. पाण्याचा ताण बसलेलं पीक कडक उन्हामुळे मुंड्या टाकतय. लाइन राहात नसल्याने सहा एकरवरील ऊसदेखील वाळून जात आहे. - मोतीराम राठोड, लिंबा, ता. पाथरी

जून महिन्यात लवकर पेरणी केलेला मूग काढला. दाणे भरण्याच्या काळात पाऊस गायब झाल्यामुळे शेंगा आखूड झाल्या. दाणे बारीक झाले. उताऱ्यात मोठी घट आली. - सिद्धेश्वर यादव, गवळी पिंपरी, ता. सोनपेठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com