दौंड तालुक्यात पाण्याअभावी ऊस, चारा पिके धोक्‍यात

भीमा नदीचे पात्र कोरडे
भीमा नदीचे पात्र कोरडे

भिगवण, जि. पुणे  ः नेहमी पाण्याची मुबलकता असणाऱ्या खानवटे व राजेगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे या भागातील सुमारे पाच हजारांहून अधिक एकर क्षेत्रातील ऊस व चारा पिके धोक्‍यात आली आहेत. 

उजनी धरण शंभर टक्के भरूनही ही अवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा निसर्गनिर्मित दुष्काळ नसून, सरकारनिर्मित दुष्काळ असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेवटचे टोक असलेले खानवटे व राजेगाव येथे भीमा नदीमध्ये कायम पाणी असते. या भागांमध्ये प्रामुख्याने शेतकरी ऊस पीक घेतात. मागील अनेक वर्षे येथे किमान जूनपर्यंत पाणी टिकते. चालू वर्षी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे शेतकरी निर्धास्त होते; परंतु मे महिन्यामध्येच येथील भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या भागांमध्ये भीमा नदीतील पाण्यावर सुमारे पाच एकराहून अधिक उसाचे क्षेत्र अवलंबून आहे. 

सध्या पावसाळाही लांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ऊस पिकास किमान महिनाभर पाण्याचा तुटवडा भासण्याची शक्‍यता आहे. महिनाभर पिकास पाणी नाही मिळाले तर ऊस जळून खाक होईल अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. शेतीबरोबरच या ठिकाणांहून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनाही अडचणीत आल्या आहेत. सरकारच्या ढिसाळ कारभाराचा फटका शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना बसत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. याबाबत येथील संदीप भोसले म्हणाले, की चालू वर्षी उजनी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे सरकारने योग्य नियोजन करण्याची आवश्‍यकता होती. धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे खानवटे व राजेगाव येथे नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीपात्र कोरडे पडल्यामुळे या भागातील सुमारे पाच हजारांहून अधिक उसाचे क्षेत्र धोक्‍यात आले आहे. पावसाळा लांबण्याची चिन्हे आहे. महिनाभर जर उसाला पाणी मिळाले नाही तर ऊस जळून खाक होईल.''

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com