पुणे जिल्ह्यात पावसाची ओढ; पिके अडचणीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पूर्वेकडील भागातील शेतकऱ्यांनी पेरलेली पीके धोक्‍यात आली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

मागील पंधरवड्यात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली. विशेष म्हणजे पश्‍चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्‍यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या दोन लाख ३० हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी एक लाख १९ हजार ७१४ हेक्‍टरवर खरीप पिकांची पेरणी झाली.

पश्‍चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे भात लागवडीला चांगलाच वेग आला होता. जिल्ह्यात सरासरीच्या ७२ हजार ९५३ हेक्‍टरपैकी आत्तापर्यंत ४० हजार ६३३ हेक्‍टरवर भात लागवड झाली आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या भागातही पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे भात लागवडीचा वेग मंदावला आहे.

पूर्व भागातील शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती या तालुक्‍यांतही पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. सुरवातीला झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या. सध्या ही पिके वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु, गेल्या सात ते आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे काही भागींत पिके सुकू लागले.

यंदा या भागात चांगल्या पावसाची अपेक्षा होती. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती नसतानादेखील कर्ज घेऊन बियाणे, खते खरेदी करून पेरण्या केल्या आहेत. मात्र, पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल होऊ लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com