कोल्हापुरातील पश्‍चिम भागात अतिपावसाने पिकांना फटका

अतिपावसामुळे ऊस पिकाचे नुकसान
अतिपावसामुळे ऊस पिकाचे नुकसान

कोल्हापूर  : संततधार पडणाऱ्या पावसामुळे पश्‍चिम भागातील पिकांवर नुकसानीचे सावट निर्माण झाले आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतात जाणे अवघड झाले असून पिके हातची जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भागातील उसासारखी हमखास उत्पादन देणारी पिकेही अडचणीत आली आहेत. आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्‍यांत पीक नुकसानीचे प्रमाण अधिक आहे.

आजरा तालुक्‍यात पिकांच्या पंचनाम्याला सुरवात झाली आहे. जोरदार पावसात महसूल, कृषी व पंचायत विभागाकडून पिकांचे पंचनामे सुरू असून अधिकाऱ्यांची पंचनामे करताना कसरत होत आहे. सुळेरान, धनगरमोळा, लिंगवाडी, घाटकरवाडी, आंबाडे, किटवडे या पाच ते सहा गावांतील पाचशे हेक्टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पश्‍चिम भागात शेकडो हेक्‍टर उसाचे पिक पावसाने बाधीत झाल्याचे सांगण्यात येते. पाच ते सहा गावांतील ९२००५, ८६०३२ या उसाच्या जाती भूईसपाट झाल्या असून नुकसानीचा आकडा वाढणार आहे. अतिवृष्टीच्या भागात तर उसाचे पीक रोगाच्या प्रादुर्भावामुळे वाया जाणार आहे. पुरेसा सूर्य प्रकाश नसल्याने उसाची वाढ खुंटली आहे. आंबाडे, किटवडे, सुळेरान, धनगरमोळा, घाटकरवाडी, पारपोली, लिंगवाडी, खेडगे, गावठाण या परिसरातील हे चित्र आहे. पेरणोली, गवसे, लाटगाव आदी १५ ते २० गावांतील ऊस उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिन्यांपासून सतत  पडणाऱ्या पावसामुळे प्रामुख्याने राधानगरी, भुदरगड, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड व पन्हाळा तालुक्‍यांमध्ये ऊस, भात, नाचणी, भुईमूग, सोयाबीन यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने (अंदाजे ६५०० ते ७५०० मिमी) पिके पूर्णपणे बाधित झालेली आहेत.

राधानगरी तालुक्‍यातील दाजीपूर, ओलवण, हसणे, कारीवडे, डिगस, राऊतवाडी, पडली, राधानगरी, फेजिवडे, शेळप व वाकीघोल परिसरातील तसेच भुदरगड तालुक्‍यातील कडगाव-पाटगाव परिसर व आजरा तालुक्‍यांतील देवडे काटकरवाडी, दहावी अंबाडे अशा आंबोलीपर्यंतच्या परिसरात दोन महिन्यांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे, यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com