पुणे जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

पावसामुळे मका पिकाचे नुकसान
पावसामुळे मका पिकाचे नुकसान

पुणे  : आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, हवेली तालुक्यांसह जिल्ह्यात विविध ठिकाणी शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी वादळी वाऱ्यांसह पूर्वमोसमी पावसाने जबरदस्त तडाखा दिला. जोरदार वारे आणि धुळीचे लोट उठून, विजा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील ऊस, बाजरी, कडवळ, मका, भाजीपाला, आंबा, केळी, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले.  

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी हंगामातील बाजरी तसेच मका, साठवलेल्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. पूर्व भागातील दावडी, निमगाव, रेटवडी, खरपुडी, कनेरसर, पूर, वरुडे, वाफगाव व चिंचबाईवाडी येथे पावसाने हजेरी लावली. वादळामुळे घरांची छपरे उडाली, तसेच भिंतीची पडझड झाली. शिरूर तालुक्‍यातील पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, दहिवडी, पारोडी, अरणगाव, नागरगाव, वडगाव रासाई गावात झालेल्या वादळी पावसाने ऊस, उन्हाळी बाजरी, कडवळ, मका आदी पिके जमीनदोस्त झाली. टाकळी हाजी, चांडोह परिसरात केळी व आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. जांबूत येथे वादळी वाऱ्याने पॅालिहाउसचे मोठे नुकसान झाले आहे. 

हवेली तालुक्यातील कोरेगाव भीमा, पेरणे, लोणीकंद, बुर्केगाव, केसनंद परिसरात पाऊस पडला. दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथे पत्रे अंगावर पडून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या. पारगाव येथे हलक्‍या गारा पडल्या. पारगाव, केडगाव, देऊळगाव गाडा, देलवडी, बोरीपार्धी परिसरात वादळी वाऱ्याने उभी पिके भुईसपाट झाली आहेत. देऊळगावगाडा मारुती कोकरे यांच्या गोठ्यावरील पत्रे उडून अंगावर पडल्याने त्यांच्या दोन बकऱ्या ठार झाल्या. डाळिंब शेतीचे मोठे नुकसान झाले.

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, धामणी, लोणी, खडकवाडी, देवगाव, लाखणगाव, पारगाव झालेल्या वादळी पावसाने आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, चांडोली बुद्रुक, कळंब, महाळुंगे पडवळ, चास परिसरात विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊस झाला. चांडोली बुद्रुक, साकोरे, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, महाळुंगे पडवळ, चास, लौकी परिसरात वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांची कांदा, बाजरी झाकण्यासाठी धावपळ उडाली. खेड तालुक्यातील चाकण व परिसरात पावसाची रिमझिम झाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com