पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान
पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान

नांदेड, हिंगोली, परभणीत सोयाबीन, कापसाचे नुकसान

सतत चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सोयाबीनच्या गंजीखाली पाणी आहे. कापसाची बोंडे सडत आहेत. उभ्या पिकांच्या शेंगांना मोड फुटले आहेत. रब्बी पेरणी लांबली आहे. - बाळासाहेब हिंगे, मजलापूर, जि. परभणी

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सलग चार -पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सुगीची कामे ठप्प झाली आहेत. खरिपातील सोयाबीन, कापूस या दोन प्रमुख नगदी पिकांचे भिजून अतोनात नुकसान झाले आहेत. सततच्या पावसामुळे काढणी तसेच मळणीची कामे करता येत नसल्याचे चित्र आहे. शेतामधील बोंडातून फुटलेल्या कापसाला तसेच सोयाबीनला मोड फुटले आहेत. डागील, ओल्या शेतीमालाची कवडीमोल दराने खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले, नद्यांचे पाणी शेतांमध्ये शिरले. कापणी केलेले तसेच गंजी लावलेले सोयाबीन पाण्याखाली गेले. नदीकाठाच्या शेतांतील सोयाबीन पाण्यात वाहून गेले. ओलावा, दमट हवामान रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरत आहे. सोयाबीनच्या शेंगा, ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. पिकांची मोठी नासाडी झाली आहे. या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. त्याखालोखाल कपाशीचे क्षेत्र आहे. नांदेड जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. सोयाबीन, कपाशी ही दोन प्रमुख नगदी पिके तसेच चारा, धान्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ज्वारी पावसामुळे वाया गेली आहे. 

प्रतिक्रिया

दोन एकरांवरील कापणी केलेल्या सोयाबीनच्या शेंगा पावसामुळे भिजून काळ्या पडल्या आहेत. पाऊस सुरूच असल्याने मळणी करता येत नाही अशी स्थिती आहे.

- लिंबाजी नागरे, येळी, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com