वादळी वाऱ्यासह अवकाळीने फळपिकांना फटका

अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान
अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

 पुणे ः नांदेड, नगर, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात सोमवारी (ता.२५) वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे अर्धापूर तालुक्यात रब्बी िपकांसह केळी, भाजीपाल्याचे नुकसान झाले. नगर, कर्जत तालुक्यात पावसाने फळबागांना फटका बसला. सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या हजेरीने द्राक्ष, आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.

अर्धापुरात केळी, रब्बी पिकांचे नुकसान अर्धापूर, जि. नांदेडः अर्धापूर तालुक्यात सोमवारी (ता. २५) मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. यामुळे केळी बागांसह काढणीस आलेली ज्वारी, गहू, हरभरा, हळद आदी पिके, आंबा तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. सोमवारी (ता. २५) मध्यरात्रीनंतर अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर, पांगरी, पार्डी, चिंचबन, मेंढला, मालेगाव आदींसह अनेक गावशिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वेगाच्या वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड जिल्हातील अनेक तालुक्यांत अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. परंतु इसापूर धरणातून पाणी आवर्तने मिळाल्यामुळे अर्धापूर तालुक्यात केळीसह रब्बी पिकांची सुगी चांगली आली होती. परंतु वादळी वाऱ्यामुळे केळी बागांतील झाडे घडासह मोडून पडली आहेत. काढणीस आलेले ज्वारी, गहू, हरभऱ्याचे पीक जमिनीवर आडवे पडले. सध्या ज्वारी, गहू, हरभरा, हळद या पिकांची काढणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी मळणी केलेला, परंतु शेतात वाळवत ठेवलेले गहू, हरभरा आदी धान्य तसेच हळद भिजली आहे. आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत. टोमॅटोसह अन्य भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

अर्धापूर येथील अंकुश माटे यांच्या गव्हाचे, तर ऋषिकेश माटे ज्वारी पिकाचे नुकसान झाले. सदाशिव शिनगारे यांच्या रेशीम कीटक संगोपनगृहाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे वृक्षांच्या फांद्या मोडून पडल्या. विजेचे खांब वाकल्यामुळे तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला. पीक नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दीड लाख रुपये खर्च करून रेशीम कीटक संगोपनगृहात प्रथम १५० अंडिपुंजाची बॅंचचे कोष उत्पादन सुरू होते. परंतु वादळी वारे, पावसामुळे भिजून संपूर्ण बॅच नष्ट झाली. छताचे नुकसान झाल्याचे अर्धापूर येथील सदाशिव शिनगारे यांनी सांगितले.

नगर, कर्जत तालुक्‍यांत वादळी पाऊस  नगर ः खडकी, वाळकी, बाबुर्डी बेंद, सारोळे कासार (ता. नगर) परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिके व फळांचे मोठे नुकसान झाले. कर्जत तालुक्यातील काही भागांत वादळी पाऊस झाला. या पावसामुळे काही प्रमाणात नुकसानही झाले.  खडकी परिसरात संत्रा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. शेतकऱ्यांनी दुष्काळात टॅंकरने पाणी आणून फळबागा जगवल्या; परंतु सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागांतील बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. यात आंबा, संत्री, डाळिंब, चिकू आदी फळबागांचा समावेश आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  कर्जत तालुक्यातील माहिजळगावसह परिसरात सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कर्जत शहरात थेंबही पडला नाही. मात्र धुळीच्या लोटामुळे येथील आठवडे बाजारातील बाजारकरूंचे  हाल झाले.  

सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असताना, सोमवारी (ता. २५) सायंकाळी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, सांगोला भागांत प्रामुख्याने अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे विशेषतः द्राक्ष, डाळिंब व आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली. दरम्यान, सांगोला तालुक्‍यात हणमंतगाव येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत सोलापूर जिल्ह्याचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. रविवारी ४०.७ अंश सेल्सिअस आणि सोमवारी ते ४०.८ सेल्सिअसपर्यंत पोचले होते. वाढत्या पाऱ्यामुळे उकाडाही वाढला आहे. रविवारी सायंकाळी असेच वातावरण होऊन काही भागांत हलका पाऊस झाला.

त्यानंतर सोमवारी (ता. २५) पुन्हा सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण व अवकाळीच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला. अवकाळी पावसाच्या  अचानक आगमनाने शेतकऱ्यांची धांदल उडाली. त्यातही द्राक्ष, डाळिंब, आंबा उत्पादकांची चिंता वाढवली. सध्या द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी उशिरा मोहोर आलेल्या आंबाच्या बागाही आहेत. काही ठिकाणी ज्वारी, गव्हाच्या कापणीचे काम सुरू आहे. त्या कामाला याचा फटका बसू शकला असता, पण पावसाचा फारसा जोर नव्हता. सांगोला, मोहोळ, उत्तर सोलापूर, बार्शी या भागांत प्रामुख्याने पावसाने हजेरी लावली.

हनुमंतगाव (ता. सांगोला) येथील शेतकरी उत्तम दत्तू खांडेकर यांच्या झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. एक लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे. मोहोळमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पावसाच्या हलक्‍या सरी पडल्या. तर, मानेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह, तर नरखेडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस झाला. अनगर परिसरातील खंडोबाचीवाडी भागात तुफानी गारांचा पाऊस झाला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com