पावसामुळे पिकांचे नुकसान सुरुच

अतिपावसाने बाजरी पिकाला कोंब फुटले आहेत.
अतिपावसाने बाजरी पिकाला कोंब फुटले आहेत.

पुणे  : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर पावसाची मुसळधार सुरूच आहे. कमी कालावधीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. मंगळवार (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील संगमनेर (ता. भोर) येथे सर्वाधिक १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शेतांमध्ये पाणी साचत असल्याने काढणी योग्य ज्वारी, कापूस, सोयाबीन, भात, बाजरी, मका आदी खरीप पिकांसह, द्राक्ष बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. जोरदार पावसाने अनेक धरणे पुन्हा ओसंडून वाहू लागली आहेत. दुष्काळग्रस्त भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली. साताऱ्यातील माणगंगा नदीला ९ वर्षांनंतर मोठा पूर आला आहे. 

अकोला तालुक्यात तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, मोताळा या भागात मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. अकोला तालुक्यातील दहिगाव गावंडेे, बोरगावमंजू, तसेच खामगाव, मेहकर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अकोट, मोताळा तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू होता. पावसामुळे सोयाबीन उत्‍पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतात सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीन भिजत आहेत. ज्वारी, कापूस पिकाला फटका बसत आहे. ज्वारीची कणसे काळी पडल्याचे दिसून येत आहेत.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस झाला. जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यातील ७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये कापून ठेवलेल्या तसेच उभ्या सोयाबीनच्या शेंगाना मोड फुटले आहेत. ज्वारीची कणसे काळी पडली आहेत. बोंडातून फुटलेला कापूस जमिनीवर गळून पडला आहे. पावसात भिजल्याने बोंडातील कापसाची वेचणी करणे कठिण झाले आहे. हाती आलेल्या शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरिपाच्या सुगीत आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

सांगली जिल्ह्यात सायंकाळी सातनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. चांदोली धरणातून ३ हजार ६०७ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू केला आहे. वारणा नदीतील पाणी पात्राबाहेर येऊ लागले आहे. मांगले-काखे पूल पाण्याखाली गेला आहे. गेल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी केली होती. शेतात पाणी साचल्याने त्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. औदुंबर (ता. पलूस) येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे.  

पुणे जिल्ह्यात दिवसभराच्या उघडिपीनंतर सोमवारी मध्यरात्री पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. भोर, दौंड, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. भोर तालुक्यातील संगमनेर येथे सर्वाधिक १६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे भाटघर, वीर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. भाटघरमधून ७ हजार ६००, तर वीर धरणातून ४२ हजार क्युसेक वेगाने, तसेच उजनी, नाझरे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला विजांच्या कडकडाटांसह पावसाने झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नदीनाल्यांमधील पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भात शेतांमध्ये पाणी साचल्याने पीक तरंगत आहे. नगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे खरिपातील काढणीला आलेल्या पिकांना फटका बसत आहेच; पण पावसाचे पाणी शेतात साचल्याने रब्बीत पेरणी केलेली ज्वारीसह अन्य पिकेही वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. अनेक संकटांतून वाचलेली पिके आता काढणीला आली आहेत. सतत पाऊस पडून पाणी साचल्याने खरिपातील सोयाबीन, बाजरी, मका, भात पिके या पिकांचे नुकसान होत असून कोंब फुटू लागले आहेत.

सोलापूर जिल्हातील अक्कलकोट तालुक्‍यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरण १०० टक्के भरले. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अक्कलकोट शहर, दुधनी, मैंदर्गी शहरांच्या पाणीपुरवठ्यासह शेतकरी व बोरी नदीकाठच्या गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून एक हजार ८०० क्‍युसेकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

खानदेशात काही भागांचा अपवाद वगळता सर्वत्र मंगळवारी (ता. २२) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. खरिपातील ज्वारी, सोयाबीन आदींची मळणी करण्यापूर्वी आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील वाघूर धरणाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. मुक्ताईनगर तालुक्‍यातील हतनूर धरणाचेदेखील दोन दरवाजे उघडण्यात आले. या पावसामुळे खानदेशात धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव या भागांतील ज्वारी, सोयाबीन, बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्वहंगामी कापूस पिकातील वेचणी पावसामुळे ठप्प झाली होती. यातच पाऊस आल्याने बोंडे काळवंडली आहेत.   अशी आहे स्थिती

  •  वेचणीयोग्य कापूस बोंडे भिजली.
  •  ज्वारीची कणसे काळवंडली.
  •  सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले. 
  •  कापणीस आलेले भातपीक पाण्यात.
  •  द्राक्ष बागांना मोठा फटका.  
  •  भाजीपाला, फुले, चारा पिकांचे नुकसान.
  •  वीर, भाटघर, चांडोली, हतनूर, वाघूर धरणांमधून विसर्ग.
  •  अक्कलकोटमधील कुरनूर मध्यम प्रकल्प भरला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com