आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १६ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

पीक नुकसानीची पाहणी करताना कृषी अधिकारी
पीक नुकसानीची पाहणी करताना कृषी अधिकारी

मंचर, जि. पुणे  : अतिवृष्टीमुळे आंबेगाव तालुक्यातील ३२ हजार ७७४ शेतकऱ्यांचे एकूण १५ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रातील जिरायती व बागायती पिकांचे १७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तालुका कृषी कार्यालयाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला. अडचणीत सापडलेले शेतकरी सध्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

तालुक्यातील ५६ आदिवासी गावांत भात व वरई ही मुख्य पिके आहेत; पण पावसाने या पिकांची दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी शेतीबांध वाहून गेल्याने आदिवासी कुटुंबांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांना लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष मोरमारे यांनी केली. सातगाव पठार भागात रब्बी हंगामात बटाटा पीक सडून गेले; तर लागवड केलेले कांदा पीक, कांदा रोपवाटिका पाण्यामुळे वाहून गेल्या. वाटाणा, भुईमूग, मका, लसूण, ज्वारी, हरभरा या पिकांचे नुकसान झाले, असे भावडी येथील शेतकरी अशोक रामदास बाजारे यांनी सांगितले.

पूर्व भागामध्ये चारापिकांचे व तरकारी मालाचे नुकसान झाले आहे. १४२ गावांत कृषी सहायक, कामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. यात जिरायती पिकामध्ये भात, वरई, नाचणी, सोयाबीन, ज्वारी; तर बागायतीमध्ये ज्वारी, भुईमूग, टोमॅटो, तरकारी, मका, कांदा, बटाटा आणि द्राक्ष, डाळिंब, केळी आदी पिकांचा समावेश आहे. नुकसानभरपाईचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे, अशी माहिती कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी  दिली.  

नुकसानभरपाई कधी मिळणार? जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सातगाव पठार व आदिवासी भागात पाच हजार ४२६ शेतकऱ्यांचे दोन हजार १९३ हेक्टर क्षेत्रातील चार कोटी ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. यासंदर्भात नुकसानीचा अहवाल तालुका कृषी कार्यालयाने जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठविला; पण अजूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानभरपाईचे पैसे कधी मिळणार, याबाबत शेतकरी वर्गात प्रश्नचिन्ह आहे, असे आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा रमेश कानडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com