मुसळधार पावसाने दाणादाण 

राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार हजेरी लावल्याने रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.
Crops damaged due to torrential rains in the state
Crops damaged due to torrential rains in the state

पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार हजेरी लावल्याने रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने मोठा फटका बसला आहे. पावसाने अक्षरशः डोळ्यांदेखत पिके उद्ध्वस्त झाली असून, उत्पादनावर परिणाम होणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पिकांना जोरदार फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबरमध्ये तब्बल सहा वर्षांनंतर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पाऊस आणि थंडीने २००० पेक्षा अधिक शेळ्या, मेंढ्या आणि पशुधन मृत झाल्याची भीती आहे. तसेच सातारा जिल्ह्यात ही मुसळधारेने दाणादाण उडवली असून, स्ट्रॉबेरी पिकासह रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत. 

तर सांगलीत द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी द्राक्ष बागा कोलमडून पडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वहंगामी द्राक्षे, फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागा, डाळिंब, काढणीस आलेला खरीप कांदा व उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या पावसाने दाणादाण उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही सूर्यदर्शन झालेले नाही. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. प्रामुख्याने पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, करमाळा असा सर्वदूर पाऊस सुरू आहे.

कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत रात्रभर मुसळधार पाऊस होता. मालवण १५०, डहाणू, पालघर प्रत्येकी ११०, तलासरी १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे आंबा, काजूसह सर्वच फळपिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे मासेमारीदेखील थांबविण्यात आली आहे. 

खानदेशात धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील नवापूर भागात मध्यम पाऊस झाला. तर धुळे येथे ८० मिलिमीटर पाऊस झाला. धुळे, शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, जळगावमधील चोपडा, जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर आदी भागांतही हलका पाऊस झाला. गारपीट, अतिवृष्टी कुठेही झालेली नाही. मात्र पावसाने कापूस पिकाला फटका बसला आहे. काही ठिकाणी वेचणीस आलेला कापूस भिजला असल्याने नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी आदी जिल्ह्यांमध्ये आकाशात ढगांची गर्दी कायम होती. तसेच काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मोठा पाऊस कोठेच झाला नाही. मात्र ढगाळ हवामानामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

वादळी पाऊस, थंडीमुळे  शेळ्या, मेंढ्या दगावल्या पुणे, सातारा, नगर जिल्ह्यांत पाऊस आणि थंडीमुळे पशूंचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सुमारे दोन हजार शेळ्या, मेंढ्या दगावल्या आहेत. तर नगर जिल्ह्यात सुमारे शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या दगावल्या. तसेच सातारा जिल्ह्यात ४० शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ही सुमारे शंभर जनावरे दगावली आहेत.

या जिल्ह्यांना पावसाचा फटका पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com