नांदेड, परभणी, हिंगोलीत लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान

चौदा एकरांवरील कापूस फुटलेला आहे. परंतु, पावसामुळे वेचणी करता येत नाही. पाणी साचून राहिल्याने सरकीला कोंब फुटले आहेत. बोंडे सडली आहेत. अडीच एकरावर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागणार आहे. - गजानन आवटे, म्हाळसापूर, जि. परभणी.
कापूस पिकाचे पावसाने झालेले नुकसान
कापूस पिकाचे पावसाने झालेले नुकसान

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत तब्बल आठवडाभरापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, ज्वारी आदी पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबायला तयार नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. हाती आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने दसऱ्यापाठोपाठ दिवाळी सणासाठीदेखील शेतकऱ्यांना उधार उसनवारी करण्याची वेळ आली आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा सोयाबीनची ८ लाख ६३ हजार ६९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उशिरा पेरणी झाल्यामुळे सोयाबीन काढणीस उशीर झाला आहे. आत्तापर्यंत जेमतेम २५ टक्के क्षेत्रावरील सोयाबीन काढणी झाली असल्याचा अंदाज आहे. पावसाच्या माऱ्यामुळे सोयाबीनला मोड फुटले आहेत. या तीन जिल्ह्यांत कपाशीची ४ लाख ८५ हजार ७८६ हेक्टरवर लागवड झालेली आहे. पाऊस सुरू असल्याने बोंडे फुटलेल्या कापसाची वेचणी करता येत नाही. पाणी साचून राहत असल्याने झाडावरील बोंडे सडली आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने जमीन शेवाळली आहे.

या तीन जिल्ह्यांत ४५ हजार ७९८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी आहे. ज्वारीचे पीक काढणीच्या अवस्थेत आहे. परिपक्व झालेली कणसे भिजल्याने काळवंडली आहेत. तुरीची १ लाख ५२ हजार ४५१ हेक्टरवर लागवड झालेली आहे. सखल भागातील तूर पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवरील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी संबंधित सर्व यंत्रंणांनी तत्काळ पंचनामे करणे आवश्यक आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com