शिरपूरला गारपिटीचा कहर; पिकांसह मालमत्तचे मोठे नुकसान

शिरपूरला गारपिटीचा कहर; पिकांसह मालमत्तचे मोठे नुकसान
शिरपूरला गारपिटीचा कहर; पिकांसह मालमत्तचे मोठे नुकसान

शिरपूर, जि. धुळे : शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी (ता. १७) सायंकाळी झालेली गारपीट, सोसाट्याचे वादळ आणि बिगरमोसमी पावसामुळे तालुक्‍यात प्रचंड नुकसान झाले. शेतात कापणीसाठी तयार असलेली रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली. खळ्यात रचून ठेवलेला शेतीमाल वादळाने कचऱ्यासारखा उडवून नेला. अनेक घरांवरील पत्रे उडाले. मोठे वृक्ष, विजेचे खांब उन्मळून पडले असून, वीजपुरवठा ठप्प झाला. यामुळे तालुक्‍यात हाहाकार उडाला. शहरात मंगळवारी सायंकाळी साडेपाचला पावसाचे तुरळक थेंब पडू लागले. पाठोपाठ सोसाट्याचा वारा सुटला. वादळ सुरू झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली. काही कळण्याच्या आतच गारपिटीला सुरुवात झाली. वादळाच्या वेगासोबत येऊन आदळणाऱ्या गारांचा तडाखा अनेकांना बसला. रस्त्यांवर गारांचा थर साचला. ऐन उन्हाळ्यात झालेली ही पहिलीच गारपीट ठरली.

शिरपूर बाजारपेठेत गोंधळ शहराच्या मुख्य बाजारपेठेत गारपीट आणि वादळामुळे दुकानदार व ग्राहकांची दैना केली. वाऱ्याने दुकानांचे फलक, ट्यूबलाइट, उन्हापासून संरक्षणासाठी बांधलेली आच्छादने अलगद उडवून नेली. भाजीपाला, फळांच्या हातगाड्या उलटल्या.

पेट्रोलपंपाचे नुकसान शहरातील पेट्रोलपंपाचे छत उडाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. शिरपूर बायपास रस्त्यावरील एसार कंपनीच्या पेट्रोलपंपावरील इंधन भरण्याचे यंत्रच वादळाने उडवून नेले. यात मोठे नुकसान झाले.

बाजार समितीला कोटींचा फटका शिरपूर बाजार समितीमध्ये गारपीट व वादळामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. तेथे मोठ्या प्रमाणात गहू, दादर, मका आणि मिरच्यांची आवक सुरू आहे. विकत घेतलेला शेतमाल वाळविण्यासाठी परिसरात पसरला असताना अचानक वादळ व गारपीट झाली. त्यात शेतमाल उडण्यासह भिजून गेल्याने मोठे नुकसान झाले. वादळाचा जोर इतका होता, की बाजार समितीमधील मिरच्या उडून एक किलोमीटरवरील शंकर पांडू माळीनगरमध्ये जाऊन पडल्या. मिरचीचा धुरळा उडाल्याने तेथील रहिवाशी ठसका, खोकल्याने बेजार झाले. पाऊस सुरू झाल्यानंतर तेथील रस्त्यांवर मिरचीचा सडा पडला. मका उडून रस्त्यावर विखुरला.

एक बळी; आठ जखमी वादळ आणि गारपिटीत एक ठार, तर आठ जण जखमी झाले. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील राजेंद्र धुडकू माळी (वय ४५, रा. कन्या शाळेजवळ, शिरपूर) यांच्या अंगावर शेड कोसळल्याने ते मृत्युमुखी पडले. वादळामुळे घरांचे पत्रे, झाडांच्या फांद्या अंगावर पडून आठ जण जखमी झाले. त्यातील प्रेम गणेश शर्मा (४७, रा. सावळदे), अमर वनवास्या पावरा (२ वर्षे), वनवास्या तारासिंह पावरा (३०, दोघे रा. प्रियदर्शिनी सूतगिरणी, तांडे), जितू थावऱ्या पावरा (५, रा. एसार पंपाजवळ, शिरपूर) व विकास संतोष सोनवणे (६३, रा. शिंगावे) यांना धुळे येथे हलविण्यात आले. लकडीबाई पावरा (३०, तापर, मध्य प्रदेश), रायसिंह पावरा (३०, रा. सूतगिरणी, तांडे) व बाज्या पावरा (३५, रा. सूतगिरणी, तांडे) यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  रब्बी पिके भुईसपाट अर्धा तास झालेले वादळ आणि गारपिटीने तालुक्‍यातील बहुतांश शेतीचे प्रचंड नुकसान झाले. कापणीवर आलेला गहू भुईसपाट झाला. हरभऱ्याचे पीक नेस्तनाबूत झाले. केळी आणि पपईच्या बागा जमीनदोस्त झाल्या. खळ्यांमध्ये रचून ठेवलेला शेतमाल पालापाचोळ्यासारखा उडून गेला. तालुक्‍यात सर्वत्र पावसाने शेती व्यवसायाची अपरिमित हानी केल्याचे समजते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com