वऱ्हाडात आता ओल्या दुष्काळाचे सावट

पावसामुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले
पावसामुळे ज्वारी पिकाचे नुकसान झाले

अकोला  ः सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात आता ओल्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. कमी अधिक प्रमाणात खरिपातील बहुतांश पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. याचा परिणाम दिवाळीसारख्या सर्वात मोठ्या सणाच्या काळात जाणवू लागला आहे. शेतात पिके हातातोंडाशी येऊनही पावसामुळे ती हिरावली जात आहे. 

या मोसमात सुरवातीच्या दोन महिन्यांत पाऊस कमी होता. मात्र ऑगस्टपासून अपेक्षित पावसाला सुरवात झाली. आता मॉन्सूनोत्तर पाऊसही जोरदार बसरत आहे. ऐन सोयाबीन, ज्वारी काढणीच्या काळात हा पाऊस होत असल्याने या भागात कोट्यवधींचा फटका बसला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्हे मिळून सुमारे सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती. ५० टक्क्यांपर्यंत सोयाबीनची काढणी पूर्ण  झाली आहे.

अनेक शेतांमध्ये सोंगणी  केलेले सोयाबीन भिजत आहे. काहींनी सुड्या रचून त्यावर प्लॅस्टिक अंथरत पीक वाचविण्याची धडपड सुरू केली. जूनमध्ये लागवड झालेल्या कापूस क्षेत्रात वेचणी सुरू झाली होती. वेचणीला आलेला कापूस झाडावर ओला झाला. ज्वारीची सोंगणीसुद्धा सुरू झालेली असून अनेकांचे  हे पीक सध्या पाण्यात तरंगत आहे. मक्याचेही असेच नुकसान झाले. ज्वारी, मक्याच्या कणसांमधून कोंब बाहेर येण्यासारखी दुर्दैवी परिस्थिती तयार झालेली आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून या भागात सर्वत्र मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सातत्याने होत आहे. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान होऊ लागले आहे. पावसासोबतच सातत्याने ढगाळ हवामान असून याचा परिणाम कपाशीवर होत असून कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. 

रब्बी पेरणी लांबली दरवर्षी दिवाळीच्या पर्वात रब्बी लागवडीची लगबग सुरू झालेली असते. यंदा मात्र सलग पावसामुळे शेत तयार करण्यास वाफसा मिळालेला नाही. सलग पावसाळी वातावरणामुळे शेत तयार करण्याचे काम लांबणीवर पडत आहे. खरिपातील पिकांचे नुकसान झाल्याने रब्बी लागवडीसाठी पुन्हा पैशांची निकड भासत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com