मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाट

राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. गुरूवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी ओळख असलेल्या विटा (जि. सांगली) येथे ११४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
Crops flattened due to torrential rains
Crops flattened due to torrential rains

पुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. गुरूवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील दुष्काळी ओळख असलेल्या विटा (जि. सांगली) येथे ११४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक शेतांचे बांध फुटले असून पिके भूईसपाट झाल्याची स्थिती आहे.

कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. तर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली होती. घाटमाथ्यावरही पावसाच्या चांगल्याच सरी बरसल्या. पावसामुळे काही भागात अजूनही पाणी वाहत असून भात पिकांना दिलासा मिळत आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पाणी टंचाईच्या परिसरातही जोरदार पाऊस झाल्याने नद्या दुथडी भरून वाहत होत्या.

नेवासा, गगनबावडा, शिरूर परिसरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. नेवासा तालुक्यातील पत्रवाळी नदीला मोठा पूर आल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील पुलावर जवळपास अर्धाफूट पाणी होते. तर सोनई घोडेगाव मार्गावरील पुलावर रात्री ३ ते ४ फूट पाणी होते. सकाळी सहा वाजता ही या पुलावर एक फुटापर्यंत पाणी वाहत होते. नदीच्या प्रवाहाबाहेर पाणी आल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते.  

मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. निलंगा, वडवणी, धारूर, तुळजापूर, रेणापूर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी भूजल पातळी वाढण्यास चांगलीच मदत होत आहे. पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांशी लहान, मध्यम व मोठे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. काही प्रकल्प भरली असून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. मात्र, अधूनमधून होत असलेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

विदर्भात पावसाचा जोर कमी असला तरी अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने पिकांना वाढीसाठी पोषक ठरत आहे. पूर्व विदर्भातील वरोरा, वाशीम, मालेगाव, भामरागड या भागात पावसाचा प्रभाव अधिक होता. परंतु अनेक ठिकाणी पिकांची काढणीची कामे सुरू असल्याने पावसाचा काही प्रमाणात अडथळा येत असल्याने शेतीकामे खोळंबली आहेत.  

गुरूवारी (ता. १७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग) कोकण : भिरा २५.४, पेण २४, रोहा २४, श्रीवर्धन ३८, मंडणगड २४, रत्नागिरी ७६.२, देवगड २०, दोडामार्ग ५२, कणकवली २१, कुडाळ ४०, मालवण ७०, रामेश्वर ७५.८, सावंतवाडी २०, वैभववाडी ५२, वेंगुर्ला ६०.६, शहापूर २८, मध्य महाराष्ट्र ः अकोले ३६, नेवासा ६२, राहता २५, राहुरी ५३, अंमळनेर २७, पारोळा ३८, गगणबावडा ६२, नंदुरबार २८, शिरूर ७५, आटपाडी २९, जत ५२.८, दहीवडी ५९, मंगळवेढा ५५, मोहोळ ३८.६, सांगोला ३६, सेालापूर ६३.९, मराठवाडा : वैजापूर २२, धारूर ५०, माजलगाव २०, वडवणी ५२, सेनगाव २८, वसमत २०, देवणी ४५, निलंगा ६४, रेणापूर ४५, शिरूर अनंतपाळ २५, नायगाव खैरगाव २४, भूम २४, उस्मानाबाद ४२, तुळजापूर ५०, पालम ३४, विदर्भ ः वरोरा ३५.७, भामरागड ३७.५, आर्वी २४.९, मालेगाव ६४, वाशिम ५४.२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com