मराठवाड्यात पावसाअभावी पिके धोक्यात

कपाशी वखरणी
कपाशी वखरणी

औरंगाबाद: पावसाअभावी मराठवाड्यातील खरिपाच्या पिकांवर अवकळा आली आहे. वाढ खुंटलेली, कोमेजलेलीच पिकं अपवाद वगळता आहेत. अवसान गमावत असलेली पिकं काढून टाकण्याचाच निर्णय शेतकरी घेत असल्याचे चित्र मराठवाड्यातील काही गावशिवारात पाहायला मिळत आहे.  मराठवाड्यातील एकूण ४२१ मंडळांपैकी अपवाद वगळता अपेक्षीत पाऊस बहुतांश मंडळात झाला नाही. दुसरीकडे ८५ मंडळात अपेक्षीत पाऊस तर सोडा १०० मिलिमिटरही एकूण पाऊस आजपर्यंत पडला नाही. त्यामुळे पाऊस येईल या आशेवर पेरणी केलेली पीक, आता मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.  त्यामुळे गेल्यावर्षीचा दुष्काळ संपते न संपते तोच मराठवाड्यातील खरिपावर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद होताना दिसत आहेत. २०, २१ व २२ जुलै दरम्यान झालेल्या पावसाने काही भागांत पिकांना संजीवनी देण्याचे काम केले. परंतु, त्यानंतर दोन दिवसांपासून तापत असलेल्या उन्हाने पिकांची काहीली करण्याचे काम सुरू केले आहे. काही ठिकाणी पीकच कोमेजून गेल्याने शेतकरी पिकच काढून टाकत आहेत. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरातील पिकांची अवस्था बिकट बनली आहे. प्रसाद पिंगळे या शेतकऱ्याने त्यांच्या वडीगोद्री व सौंदलगाव शिवारातील दहा एकर कपाशीवर वखर फिरविण्याचा निर्णय घेतला. उगवून आलेली कपाशी अपुऱ्या पावसामुळे करपून चालली होती. पावसाअभावी अनेक दिवसांपासून जमीनच सोडू न शकलेल्या या पिकावर वखर फिरविण्याचा निर्णय शेतकरी पिंगळे यांनी घेतला.  अपेक्षीत पावसाच्या तुलनेत ६९ टक्‍के पाउस पडलेल्या औरंगाबाद तालुक्‍यातील करमाड मंडळांतर्गत वाहेगाव देमनी येथील जवळपास ५ ते ६ शेतकऱ्यांनी गत दोन दिवसांत आपली पावसाअभावी सुकलेली पिके काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. करमाड मंडळात आजपर्यंत १४२ मिलिमिटर पाउस पडला आहे. गत पंधरवड्यात केवळ दोन दिवसच अनुक्रमे १९ व ९ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी झपाट्याने पीक कोमेजत असून दिवसागणीक पीक काढून टाकणाऱ्या शेतकऱ्यांचीही संख्या वाढत आहे.  मराठवाड्यातील खरीप पेरणी स्थिती

  • मराठवाड्यातील सरासरी क्षेत्रः ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टर
  • मराठवाड्यातील प्रत्यक्ष पेरणीः ३४ लाख ८८ हजार ४३ हेक्‍टर
  • औरंगाबाद कृषी विभागातील सरासरी क्षेत्रः २० लाख ८३ हजार ८८५ हेक्‍टर
  • औरंगाबाद कृषी विभागातील पेराः १६ लाख ४६ हजार ६९६ हेक्‍टर
  • लातूर कृषी विभागातील सरासरी क्षेत्रः  २९ लाख १२ हजार २९८ हेक्‍टर
  • लातूर कृषी विभागातील पेरणी: १८ लाख ४१ हजार ३५२ हेक्‍टर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com