हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा बरसीम लागवड..

cultivation of barsim
cultivation of barsim

बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम अलेक्झॅन्ड्रियम एल.) हे द्विदलवर्गीय पीक असून मेथीसारखे दिसत असले तरी उंची अधिक असते. नोव्हेंबर ते मे महिन्यापर्यंत उपलब्ध होणाऱ्या या पिकाचा चारा चवदार, रुचकर, पालेदार, सकस व लुसलुशीत असतो. त्यात प्रथिनांचे प्रमाण १७ ते १९ टक्के असते. बरसीम सोबत वाळलेला चारा (भुसा, कडबा) दिल्यास जनावरांमध्ये पोटफुगीचा त्रास होत नाही. हिवाळी हंगामात पशुधनास हिरवा लुसलुशीत चारा पुरेशा प्रमाणात उपलब्धतेसाठी बरसीमची लागवड फायदेशीर ठरते. जमीन व हवामान

  • बरसीम या पिकास मध्यम ते भारी प्रतीची व पाण्याचा निचरा होणारी भुसभुशीत जमीन मानवते.  
  • क्षारयुक्त जमिनीतही हे पीक चांगल्याप्रकारे घेता येऊ शकते.  
  • हे पीक थंड आणि उबदार हवामानास उत्तम प्रतिसाद देते. भरपूर थंडी यासाठी फायदेशीर असून, थंडीचा कालावधी जास्त राहिल्यास बरसीमच्या हिरव्या चाऱ्याकरिता कापण्या अधिक मिळतात. चारा उत्पादन वाढते.
  • पूर्व मशागत

  • एक नांगरणी व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. पेरणी पूर्वी जमीन तणविरहित करावी. त्यानंतर ५ × ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
  • सुधारित वाण

  • सुधारित वाणांमध्ये वरदान, मेसकवी, बुंडेल बरसीम – २ इ.
  • बियाणे व पेरणी

  • बरसीम पिकाची पेरणी ओळीत ३० से.मी. अंतरावर ५ × ३ मी आकाराच्या तयार केलेल्या वाफ्यात मार्करच्या साहाय्याने करावी.  
  • पेरणीकरिता हेक्टरी २५ किलो बियाणे पुरेसे होते. बी फोकून पेरणी केल्यास रोपांची उगवण एकसारखी होत नाही व आंतरमशागतीस त्रास होतो.  
  • पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान करावी.
  • बियाणे प्रक्रिया

  • पेरणीपूर्वी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धक चोळावे. त्यामुळे मुळावरील सूक्ष्मजिवाणूंच्या गाठींचे प्रमाण वाढते. हे जिवाणू हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरणास मदत करतात.
  • खत व्यवस्थापन

  • द्विदल वर्गीय पीक असल्यामुळे नत्र खताची मात्रा कमी लागते, तर स्फुरद खताची मात्रा जास्त लागते. योग्य वाढीसाठी पेरणीपूर्व पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत चांगले मिसळावे. यामुळे पिकाची वाढ जोमदार होण्यास मदत होते.  
  • पेरणीच्या वेळी हेक्टरी २० किलो नत्र (४३ किलो युरिया), ८० किलो स्फुरद (५०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ४० किलो पालश (६७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) मिश्रण करून टाकावे.
  • पाणी व्यवस्थापन

  • जमिनीतील ओलावा लक्षात घेऊन १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. मात्र, कापणीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर पाण्याची पाळी येईल याप्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास हिरव्या चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळते.
  • आंतरमशागत

  • बरसीम पीक तणाच्या चढाओढीस संवेदनशील असल्याने पेरणीपूर्वीच तण नियंत्रण करावे. वेळीच तण नियंत्रणासाठी एक किंवा दोन खुरपण्या करून घ्याव्यात.  
  • पेरणी ३० से.मी. अंतरावर ओळीत केल्याने दोन ओळीतील जागेत कोळपणी करता येते. यामुळे माती भुसभुशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते.
  • पीक संरक्षण

  • बरसीम बीजोत्पादनाच्यावेळी बोंडे व फुले खाणारी अळीचा जास्त प्रादुर्भाव दिसताच त्यावर एच. ए. एन. पी. व्ही. १ मि.लि. + न्यूमोरिया रिलेई ५ ग्रॅम प्रतिलीटर या प्रमाणे संध्याकाळच्या वेळेस फवारावे.  
  • मावा किडीपासून संरक्षणासाठी निंबोळी अर्क ५ % किंवा व्हर्टीसिलियम लेकॅनी ४ ग्रॅम प्रती लीटर पाणी या प्रमाणे फवारावे.  
  • हे जैविक कीटकनाशक फवारल्यानंतर ५ दिवस जनावरांना हा चारा खाऊ घालू नये.
  • कापणी

  • हिरव्या चाऱ्यासाठी बरसीमची पहिली कापणी साधारणतः पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांच्या अंतराने कराव्यात. सरासरी बरसीमच्या ५ ते ६ कापण्या होतात.
  • बीजोत्पादन पद्धत

  • या पिकापासून बीजोत्पादन घेण्यासाठी चाऱ्याकरिता घेतलेल्या पिकामधूनच आवश्यक क्षेत्र राखून ठेवता येते. याकरिता पिकाची चाऱ्यासाठी कापणी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येईल, असे नियोजन करावे.  
  • कापणीनंतर पिकास १५ ते २० दिवस पाण्याचा ताण द्यावा. दरम्यानच्या काळात पीक तणविरहित ठेवून जमीन हलवून घ्यावी.  
  • पुढील प्रत्येक पाण्याच्या पाळीतील अंतर ४ ते ५ दिवसांनी वाढवावे. याप्रकारे बियाणे तयार होण्यास ७५ ते ८० दिवसांचा कालावधी लागतो.  
  • साधरणपणे मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पीक बियाण्याच्या कापणीस तयार होईल. कापणीनंतर पीक पूर्णपणे वाळवावे. त्यानंतर मळणी करून बियाणे स्वच्छ करावे.  
  • पूर्ण वाळलेले बियाणे योग्य पद्धतीने साठवून ठेवावे. शिल्लक भुसा जनावरांस खाऊ घालावा. अशाप्रकारे बरसीम पिकापासून हिरव्या चाऱ्याचे उत्पादन आणि बीजोत्पादनही घेता येते.
  • उत्पादन

  • बरसीम पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी ६०० ते ८०० क्विंटल हिरव्या चाऱ्यांचे उत्पादन मिळते.
  • संपर्कः तुषार भोसले, ८००७६५६३२४, ८८३०११७६९१ (पीएच. डी. विद्यार्थी, पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com