किफायतशीर पीक: मोहरी

रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्यावर वेळेवर पेरणी केल्यास मोहरीची लागवड फायदेशीर ठरते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चांगले उत्पादन देण्याची क्षमता असलेली टी.ए एम. १०८-१ ही जात विकसित केली आहे.
Black mustard
Black mustard

रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्यावर वेळेवर पेरणी केल्यास मोहरीची लागवड फायदेशीर ठरते. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चांगले उत्पादन देण्याची क्षमता असलेली टी.ए एम. १०८-१ ही जात विकसित केली आहे. सुधारित तंत्र वापरून पीक उत्पादन वाढविणे शक्य आहे. मोहरी हे  पीक साधरणत: दोन किंवा तीन ओलिताच्या पाळ्या दिल्यास चांगले उत्पन्न देते.मध्यम ते भारी प्रकारची, पाण्याचा चांगला निचरा करणारी जमीन निवडावी.खरीप पिकाची काढणी झाल्यानंतर जमीन खोलवर नांगरून आडवी उभी वखरणी करून भुसभुशीत करावी. ओलिताखाली पीक घ्यावयाचे झाल्यास वखराच्या किंवा सारा यंत्राच्या साहाय्याने सारे पडावेत. जेणेकरून पाणी चांगले समप्रमाणात देण्यात येईल. 

  • पेरणी करिता साधरणत: ४ ते ५ किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे. 
  • बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणीच्या आधी रात्री बियाणे ओलसर पोत्यात ठेवावे. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. 
  • ऑक्‍टोबरचा शेवटचा पंधरवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. 
  • पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवावे. दोन झाडातील अंतर १५ सें.मी. ठेवावे. मोहरीचे बियाणे आकाराने लहान असल्यामुळे बियाण्याच्या आकाराची वाळू सम प्रमाणात मिसळून नंतर पेरणी करावी, त्यामुळे बियाणे सर्व क्षेत्रात समप्रमाणात पडेल. 
  • बियाण्याची चांगली उगवण होण्याच्या दृष्टीने पेरणी साधरणत: ३ ते ४ सें.मी. खोलीवर करावी. बियाणे ओलाव्यावर पडेल अशा बेताने पेरावे. कोरडवाहू मोहरीची पेरणी जमिनीत ओल असताना तसेच ओलीताखालील मोहरीच्या पेरणी करिता पेरणीपूर्वी एक ओलिताची पाळी देऊन वाफसा येताच पेरणी करावी. पाणी देण्यासाठी सारे काढावेत. 
  • भात कापणी नंतर लगेच मोहरीची पेरणी फायदेशीर ठरते.  
  • मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकामध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेता येते. सलग गहू पीक घेण्यापेक्षा गहू पिकामध्ये ९:१ किंवा ६:१ या प्रमाणात आंतरपीक घेणे  फायदेशीर ठरते. 
  • पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी.  साधरणत: दोन झाडातील अंतर १० ते १५ सें. मी. राहील या दृष्टीने विरळणी किंवा खाडे भरणी करावी. 
  • उगवणीनंतर ५० दिवसांच्या काळात पीक तण विरहित ठेवावे. पेरणीपासून २० आणि ४० दिवसांनी २ निंदणी आणि दोन डवरणी कराव्यात.
  • आरोग्यदायी मोहरी

  • मोहरीच्या बियांमध्ये ३२ ते ४० टक्के तेलाचे प्रमाण असते. 
  • कोवळ्या हिरव्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. भरपूर प्रमाणात मॅग्नेशिअम तसेच ‘अ’ आणि ‘क’ ही आवश्यक जीवनसत्वे असतात. 
  • मोहरीच्या ढेपेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आहेत. दूध देण्याऱ्या जनावरांकरिता उपयुक्त खाद्य आहेत.
  • पाणी व्यवस्थापन 

  • निश्चित ओलीताची सोय असल्यास उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या अंतराने ओलिताच्या तीन पाळ्या द्याव्या. 
  • दोनच ओलिताच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पेरणीनंतर एक महिन्याने पहिले व पीक फुलांवर असताना दुसरे ओलित करावे. 
  • एकच ओलित करणे शक्य असल्यास पीक फुलोऱ्यावर असताना ओलीत करावे.
  • सुधारित जाती  

    जात     परिपक्व होण्याचा कालावधी (दिवस) हेक्टरी उत्पादन (क्विंटल)  तेलाचे प्रमाण (%)
    टी. ए. एम.- १०८-१  १०१   १०-१२ ४०
    शताब्दी (ए.सी.एन-९)   ९५-१०५ ८-१२ ३१-४०
    एनआरसीएचबी-१०१ १०५-११५  ८-१०   ३५-४०

    खत व्यवस्थापन

  • ओलिताखाली हे पीक घेत असताना हेक्टरी ५० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद या रासायनिक खताची मात्रा द्यावी. हेक्टरी २५ किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद पेरणीच्या वेळेस आणि उरलेले २५ किलो नत्र २५ ते ३० दिवसांनी म्हणजेच पहिल्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस द्यावे. 
  • उत्पादन वाढीसाठी प्रती हेक्टरी २० किलो गंधक आणि १ किलो बोरॉन पेरणीच्या वेळीच द्यावे. 
  • कोरडवाहू परिस्थितीत प्रती हेक्टरी ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद द्यावे. कोरडवाहू मोहरीच्या अधिक उत्पादनासाठी शिफारसीत खत मात्रेसह ५० टक्के फुलोरा अवस्थेत १ टक्का युरियाची फवारणी करावी.
  • संपर्क- डॉ. जीवन कतोरे, ८२७५४१२०१२ डॉ. संदीप कामडी, ९४२३४२१५६७ (अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प कृषी महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com