काळ्या गव्हाच्या लागवडीची महाराष्ट्रासाठी शिफारस नाही 

काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म असल्याने अधिक दर मिळत असल्याच्या चर्चा होत आहे. त्यामुळे अनेक जण लागवडी करत आहेत. याचा फायदा घेत काही घटक चढ्या दराने म्हणजेच ८० ते १५० रुपये दरम्यान प्रतिकिलो बियाणे विक्री करत असल्याने सध्या अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
Cultivation of black wheat is not recommended for Maharashtra
Cultivation of black wheat is not recommended for Maharashtra

नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म असल्याने अधिक दर मिळत असल्याच्या चर्चा होत आहे. त्यामुळे अनेक जण लागवडी करत आहेत. याचा फायदा घेत काही घटक चढ्या दराने म्हणजेच ८० ते १५० रुपये दरम्यान प्रतिकिलो बियाणे विक्री करत असल्याने सध्या अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. याबाबत शहानिशा करण्यासाठी करनाल (हरियाना) येथील भारतीय गहू व जव संशोधन केंद्राकडे विचारणा केली असता, हे दावे खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काळ्या गव्हाच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचे समोर आले आहे. 

राष्ट्रीय कृषी अन्न जैव तंत्रज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञ डॉ. मोनिका गर्ग यांनी या वाणासंबंधी संशोधन केले आहे. मात्र १९६५ च्या बियाणे कायद्याच्या राजपत्र अधिसूचनेनुसार वाणाची नोंद होणे महत्त्वाचे असते. त्याशिवाय बीजोत्पादन व व्यावसायिक उत्पादन घेतले जात नाही, असे गहू संशोधन केंद्राचे म्हणणे आहे. मात्र असे असताना अव्वाच्या सव्वा दराने बियाणे विक्रीचा काळाबाजार सुरू आहे. तर काही शेतकरी अधिक दराच्या लोभात वाणाविषयी कुठलीही शास्त्रीय माहिती नसताना लागवडी करत आहेत. 

भारतीय गहू संशोधन संस्थेने काळ्या गव्हासंबंधी पोषकतत्त्वाच्या संबंधी तपासणी करून यासंबंधी विश्‍लेषण केले आहे. त्यात गेल्या ५० वर्षांत राष्ट्रीय पातळीवर असलेल्या गहू वाणांच्या तुलनेत या वाणात पोषणतत्त्वे, रोगप्रतिकारकता व उत्पादकता कमी दिसून आली असून तो तुलनेत सरस नाही, असे सांगण्यात आले आहे. मात्र काळ्या वाणासंबंधी राष्ट्रीय स्तरावरून शिफारस नसताना लागवडी केल्या जात असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काळ्या गव्हाचा कुठलाही वेगळा वाण नसून कुठलेही वेगळेपण त्यात नाही. असा वाण सरकारकडून प्रसारित न झाल्याने स्पष्ट करण्यात आले आहे. 

अनेक शेतकऱ्यांनी काळ्या गव्हाच्या पेरण्या केल्या. मात्र हे बियाणे कुठून आले, कोणी उपलब्ध करून दिले अन् लागवडी वाढविण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे. उत्पादनपश्‍चात विक्रीच्या अडचणी आल्यानंतर विक्री करण्यासंबंधी शेतकऱ्यांची गहू संशोधन केंद्राकडे मागणी होत आहे. तर अनेक जण तक्रारी करत आहेत. 

महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस नाही : नाबी  राष्ट्रीय कृषी अन्न जैव तंत्रज्ञान संस्थेने (नाबी) या वाणाची शिफारस फक्त उत्तर भारतासाठी केली असल्याने डॉ. गर्ग यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात अद्याप प्रक्षेत्र चाचण्याही झालेल्या नाहीत. मात्र तरीही काही शेतकरी लागवडी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यामुळे गुंता वाढत जात आहे. संस्थेने काही ठरावीक कंपन्यांशी बियाणे हस्तांतर करून कंपनी पातळीवर उत्पादनासंबंधी करार केले आहेत. मात्र काही कंपन्या व विक्रेते त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे बियाणे व गहू विक्री सध्या केंद्र सरकारच्या बियाणे वितरण व्यवस्थेला आव्हान ठरत आहे. 

गहू संशोधन केंद्राच्या माहितीनुसार काळ्या गव्हाच्या बाबतीत तथ्य : 

  • इतर गहू वाणांच्या तुलनेत प्रथिने, लोह, जस्त यांची उपलब्धता अधिक नाही 
  • इतर वाणांच्या तुलनेत कमी उत्पादकता 
  •  केंद्राने केलेल्या मूल्यांकन निकषात हा वाण सरस ठरलेला नाही 
  •  इतर वाणांच्या तुलनेत रोगप्रतिकारक नाही. 
  •  उत्पादनपश्‍चात विक्रीकरिता अडचणी   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com