बांधावरील फणसाची शेती ठरतेय ‘लाख’मोलाची...

फणस म्हटले की प्रामुख्याने कोकणातील फळपीक म्हणून डोळ्यासमोर येते. मात्र, जिल्ह्यातील अकोट येथे देविदासराव मिसाळ या शेतकऱ्याने बांधावर लावलेली फणसाची झाडे आता बागेत रुपांतरीत झाली आहेत..
The cultivation of chanterelle on the dam is worth lakhs
The cultivation of chanterelle on the dam is worth lakhs

अकोला ः फणस म्हटले की प्रामुख्याने कोकणातील फळपीक म्हणून डोळ्यासमोर येते. मात्र, जिल्ह्यातील अकोट येथे देविदासराव मिसाळ या शेतकऱ्याने बांधावर लावलेली फणसाची झाडे आता बागेत रुपांतरीत झाली आहेत. बांधावरील ही झाडे वर्षाला दीड लाखांपर्यंत उत्पन्न देत असल्याचे मिसाळ यांचा मुलगा वामन यांनी सांगितले. 

अकोट येथील रहिवासी असलेले मिसाळ यांची गावशिवारात २० ते २२ एकर शेती आहे. यातील सर्वच शेती बागायती असून त्यात केळी, टरबूज व इतर बागायती पिके ते घेतात. बहुतांश क्षेत्र एकाच ठिकाणी आहे. देविदास मिसाळ यांनी साधारणतः ३० वर्षांपूर्वी शेताच्या बांधावर १०० पेक्षा अधिक फणसाची रोपे लावली होती. 

मागील काही वर्षांपासून त्यांची ही बांधावरची झाडे आता वर्षाला दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून देत आहे. कुठल्याही प्रकारचे फारसे व्यवस्थापन न करता नैसर्गिकरित्या या झाडांना फळधारणा होते. हंगामात ही फळे ते व्यापाऱ्यांना थेट विक्री करतात. झाडांना वर्षातून एकदा शेणखत टाकले जाते. याशिवाय इतर कुठलीही खते दिली जात नाहीत. सोबतच स्वतंत्रपणे काहीही पाणी व्यवस्थापन करण्याची गरज पडत नाही. तसेच कीड रोगांसाठीसुद्धा फवारणी घेण्याची गरज पडत नसल्याचे वामन यांनी सांगितले. 

नैसर्गिकरित्या तयार होणारी ही फणसाची फळे खाण्यास पोषक व चविष्ट आहेत. या शेतीबाबत माहिती देताना वामन म्हणाले, वडिलांनी तेव्हा दूरदृष्टी ठेवत ही झाडे लावली होती. सुरुवातीला किती उत्पादन येईल याची माहिती नव्हती. मात्र, आता दरवर्षी प्रत्येक झाडावर मोठ्या संख्येने फळे लागतात. यातील ९० टक्क्यांवर फळे विक्रीसाठी तयार होतात. व्यापारी थेट शेतातूनच हा माल घेऊन जातो. त्यामुळे मार्केटिंगची वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडत नाही. इतर पिकांच्या बरोबरीने ही झाडे आता हमखास उत्पन्न मिळवून देत असल्याचे पाहत ते आणखी नव्याने लागवड करीत असल्याचे म्हणाले. यासाठी स्वतः रोपनिर्मिती केली असून येत्या हंगामात रोपांची पेरणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  संपर्क : वामन मिसाळ  +919922234975

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com