मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवड

मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या पट्ट्यात यंदा औरंगाबाद व लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी रब्‍‌बीत कपाशी लागवड केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या या धाडसी प्रयोगाला किती यश मिळते व त्याचे काय परिणाम हाती येतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
 Cultivation of cotton in Marathwada
Cultivation of cotton in Marathwada

औरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या पट्ट्यात यंदा औरंगाबाद व लागून असलेल्या जालना जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी रब्‍‌बीत कपाशी लागवड केली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या या धाडसी प्रयोगाला किती यश मिळते व त्याचे काय परिणाम हाती येतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड व हिंगोली कापूस पिकवणारे जिल्हे आहेत. १२ ते १५ लाख हेक्‍टरपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मिळून कपाशीचे क्षेत्र असते. यंदा या क्षेत्रात मोठी घट पाहायला मिळाली. हिंगोली, बीड पाठोपाठ, औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील कपाशीच्या क्षेत्रात झालेली घट व त्यानंतर राहिलेली प्रतिकूल परिस्थिती पाहता यंदा कापसाच्या उत्पादनातही घट होणार हे स्पष्‍‌ट होते. उत्पादनात घट झाल्याने कापसाचे दरही काही प्रमाणात वधारले आहेत. 

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील तळेगाव, निमखेड, तसेच जालना जिल्ह्यातील मसला येथील शेतकऱ्यांनी खरिपातील मका वा इतर पिके काढल्यानंतर मोजक्‍या क्षेत्रावर रब्बीत कपाशी लागवडीचा प्रयोग केला जात आहे. मसला येथे दोन, तर तळेगाव येथे ४ ते ५ शेतकऱ्यांनी अर्धा ते एक एकरा दरम्यान रब्‍‌बीत कपाशी लागवडीचा प्रयोग हाती घेतला. निमखेडचे शेतकरी रमेश फुके यांनी ३० गुंठे क्षेत्रावर मका काढून १२ नोव्हेंबरला कपाशीची लागवड केली. तळेगावचे कृष्‍‌णा फलके यांनीही चाऱ्यासाठीची मका काढून २५ ऑक्‍टोबरलाच एक एकरावर कपाशीची लागवड केली आहे.

तसेच बाबासाहेब उकिर्डे यांनी एक एकरा क्षेत्रावर ४ बाय सव्वा फूट अंतरावर कपाशी लागवडीचा प्रयोग केला आहे. हाच प्रयोग जालना जिल्ह्यातील मसला येथील दोन शेतकऱ्यांनीही केल्याचे उकिर्डे यांनी सांगितले. यातील काही शेतकऱ्यांच्या प्रयोगाची औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली. इतरही काही ठिकाणी प्रायोगिक लागवड झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माझ्या ३० गुंठ्यांत मी रब्‍‌बीत कपाशी लागवडीचा प्रयोग केला. प्रयोग करून पाहावे म्हणून लागवड केली. आता कपाशीवर कोकडा आहे, मका काढून कपाशी लावली आहे. - रमेश फुके, निमखेडा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद

चाऱ्याची मका काढून एक एकरावर कपाशीची लागवड केली. प्रयोग म्हणून या कपाशी लागवडीकडे मी पाहतो आहे. - कृष्‍‌णा फलके, तळेगाव ता. फुलंब्री. जि. औरंगाबाद यंदा खरिपातील कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. शिवाय प्रतिकूल परिस्थिती असल्याने उत्पादनात घट येईल याचा अंदाज होताच. एक नोव्हेंबरला एक एकराावर कपाशीची लागवड केली आहे. - बाबासाहेब उकिर्डे, तळेगाव, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद

रब्बीत कपाशी लागवडीची शिफारसच नाही. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पुढील हंगामात वाढण्यासाठी ही लागवड कारणीभूत ठरू शकते. प्रयोगाअंती १५ जुलैनंतर लागवड केल्यास उत्पादनात भारी घट येते, असा निष्‍‌कर्ष विद्यापीठाने काढलेला आहे. - डॉ. खिंजर बेग, कापूस विशेषज्ञ कापूस संशोधन केंद्र, नांदेड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com